Swine Flu | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Registers 3 Swine Flu Deaths: राज्याच्या आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात जुलै महिन्यात स्वाइन फ्लू (Swine Flu) ने तीन मृत्यू नोंदवले आहेत. तिन्ही मृत व्यक्ती नागपूर विभागातील असून त्यांना सह-आजार होते. राज्यात जुलै महिन्यात स्वाइन फ्लूचे 65 रुग्ण आढळले असून त्यापैकी 85% रुग्ण हे मुंबईतील आहेत. स्वाइन फ्लू (H1N1 फ्लू) हा इन्फ्लूएंझा ए विषाणूच्या प्रकारामुळे होणारा श्वसन रोग आहे.

ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वासोच्छवासाचा त्रास होत असलेल्या व्यक्तींनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सह-विकार असलेल्या व्यक्तींनी स्वत: औषधोपचार करू नयेत, असं राज्य महामारीविज्ञान प्रभारी डॉ. बबिता कंपलापूरकर यांनी सांगितलं आहे. याशिवाय, गेल्या दोन आठवड्यांत 4 ते 5 स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करत असलेले डॉ. बेहराम पार्डीवाला यांनी सांगितले की, हे रुग्ण मध्यमवयीन किंवा वृद्ध आहेत. ते गंभीर खोकला आणि सर्दी आणि सौम्य ऑक्सिजन डिसॅच्युरेशनसह रुग्णालयात आले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून येत आहेत. (हेही वाचा - Red Alert Declared in Pune: पुण्यात रेड अलर्ट जाहीर! मुंबई, रत्नागिरी आणि इतर जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट)

तीव्र खोकला आणि सर्दी झाल्यास, लोकांनी मास्क घालून डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. पावसात भिजल्यास स्वतःला पूर्णपणे कोरडे करा. खोकला कायम राहिल्यास, स्वाइन फ्लू टाळण्यासाठी चाचण्या कराव्यात आणि चाचणीच्या निकालांवर अवलंबून डॉक्टरांना भेट द्यावी, असं डॉ. पारडीवाला यांनी सांगितलं.

डॉक्टरांनी सांगितले की, त्यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून H3N2 रुग्णांची वाढ नोंदवली आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये उच्च दर्जाचा ताप, सांधेदुखी, खोकला आणि अशक्तपणा यांचा समावेश होतो, जो दोन आठवड्यांपर्यंत टिकू शकतो.