डोंबिवली: 'उत्सव' सोहळ्यात एकाच दिवशी 25 हजार बटाटेवडे तळून शेफ सत्येंद्र जोग घडवणार अनोखा विक्रम; काय आहे हा उपक्रम जाणून घ्या
Batatawada (Photo Credits: Instagram)

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक शहरात वेगवेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते, पारंपरिक कलाविष्कार, खाद्यसंस्कृती, आणि बरंच काही या उत्सवात समाविष्ट असतं. सांस्कृतिक शहर अशी ओळख असणाऱ्या डोंबिवली (Dombivli) शहरात देखील आज, 28 डिसेंबर रोजी,'उत्सव' (Utsav) या वार्षिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, दरवर्षीच हा सोहळा चर्चेत असतो मात्र यंदा हा कार्यक्रम एका वेगळ्या कारणाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मराठमोळ्या संस्कृतीचे तसेच मुंबईचे प्रतीक असणारे बटाटेवडे (Battata Wada) या कार्यक्रमाचे यंदाचे वैशिष्ट्य असणार आहे. उत्सव च्या मंचावरून या चविष्ट पदार्थाला जागतिक दर्जा मिळवून देणारे शेफ सत्येंद्र जोग (Satyendra Jog) आज, एकाच दिवशी तब्बल 25 हजार बटाटेवडे तळून एका वेगळ्या विक्रमला गवसणी घालण्याच्या तयारीत आहेत. हा उपक्रम यशस्वी झाल्यास त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् (Limca Book Of World Records) मध्ये नोंद होणार आहे.

मटाच्या माहितीनुसार, सत्येंद्र जोग हे मागील 15 वर्षांपासून उपाहारगृह सल्लागार म्हणून ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक व इंदूर या ठिकाणी काम करत होते. एक मराठी भाषिक असल्यामुळे मराठमोळ्या बटाटावड्याला जागतिक कीर्ती मिळवून देण्यासाठी काय करता येईल, यावर विचार करताना त्यांना ही अभिनव कल्पना सुचली. (World Vada Pav Day: मुंबई मधील या '7' वडापावची चव नक्की चाखाच!)

दरम्यान, शनिवारी सकाळी 10 वाजता 1 हजार 500 किलो बटाटे, 500 लिटर तेल, 350 किलो बेसन आणि अन्य साहित्य तसेच, 70 ते 80 जणांची टीम 'उत्सव'च्या व्यासपीठावरून या विक्रमासाठी शुभारंभ करणार असून जोग हे सहकाऱ्यांच्या मदतीने तयार केले जाणारे 25 हजार बटाटेवडे तब्बल 12 तास तापलेल्या तेलाच्या कढईसमोर उभे राहून तळणार आहेत. तासाला 2500 बटाटेवडे असे उद्दिष्ट त्यांनी ठेवले असून या उपक्रमाला सुमारे 10 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटी अभिनेते गिरीश ओक यांच्या हस्ते या 'रेकॉर्ड वीरा'चा सन्मान केला जाणार आहे.