शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे शहर नागरिकांसाठी सुरक्षित असल्याचे मानले जात होते. मात्र गेल्या काही वर्षात झपाट्याने विस्तारणाऱ्या या शहराबद्दल आता सुरक्षिततेची हमी देणे शक्य नाही. याचे कारण आहे दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोड्या आणि त्यांचे वाढते प्रमाण. पुण्यात ही गंभीर परिस्थिती असली तरी पुणेकर मात्र याबद्दल फारसे जागृक नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स या कंपनीने गेल्या तीन महिन्यात पुण्यातील विविध भागात सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण पुण्यासह देशातील मेट्रो शहरांमध्येही करण्यात आले. पुण्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 250 लोकांशी थेट संवादही साधण्यात आला. यातून पुणेकरांविषयी नवी माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार, सुमारे 25% पुणेकर बाहेर जाताना घराला कुलूप लावण्यास विसरतात. तसंच पुणेकर आपल्या सुरक्षितते बाबतीत फार गंभीर नसल्याचेही समोर आले आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुण्याचा नंबर अगदी खालचा आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात देखील पुणेकर उदासीन असल्याचे दिसून आले आहे. देशातील इतर शहरांमध्ये सुमारे 43% प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असताना पुण्यात हे प्रमाण केवळ 16% आहे. (9 फेब्रुवारी पासून पुणेकरांच्या दिमतीला E-Bus; पहा वैशिष्ट्यपूर्ण E-Bus कोणत्या मार्गावर धावणार, तिकीट दर किती?)
सर्वेक्षणातून समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे
# 25% पुणेकर घराबाहेर पडताना कुलूप लावायला विसरतात.
# मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी केवळ 30% पुणेकरांची लॉकरला पसंती, मौल्यवान वस्तू घरात ठेवण्यावर अनेकांचा भर.
# 10 पैकी 3 लोक घराबाहेर पडताना खिडक्या बंद करण्यास विसरतात.
# 27.5% पुणेकर कुलूप लावल्यानंतर घराची किल्ली दरवाजा जवळ एखाद्या ठिकाणी लपवतात.
# पुण्यातील घरी/कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे प्रमाण केवळ 16% आहे.
हे सर्वेक्षण पाहता पुणेकरांना आता सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेत अधिक सर्तक होण्याची गरज असल्याचे दिसून येते.