Coronavirus in India (Photo Credits: IANS)

पुणे (Pune) शहरात दिवसभरात 20 नवे कोरोना बाधित (Coronavirus) रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 243 वर पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील 284 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पिंपरी चिंचवडमधील 30 तर ग्रामीण मधील 11 कोरोना रुग्णाचा समावेश आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohal) यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्येही आता कोरोनावर उपचार मिळणार आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाविरोधात सुरु असलेल्या लढ्यात सिम्बॉयोसिस पाठोपाठ आता भारती हॉस्पिटलही सहभागी झाले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आता भारती हॉस्पिटलदेखील उपलब्ध झाले आहे. या रुग्णालयात 135 विलगीकरण आणि 15 अतिदक्षता बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात 221 कोरोना बाधित रुग्णांची वाढ तर 22 जणांचा मृत्यू; राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली)

भारती हॉस्पिटलला PPE किट आणि N95 मास्क महापालिका पुरवणार असून कोरोना संशयित रुग्ण, बाधित रुग्ण व्यवस्थापन, उपचार आणि मनुष्यबळ सेवा सुविधा दिली जाणार आहे. रुग्णावरील खर्च हा मनपाचे वतीने शासनाच्या CGHS नुसार भारती विद्यापीठास देण्यात येणार आहे, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रात 221 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली आहे. यापैकी 217 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज राज्यात 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.