मुंबईमध्ये कोरोनाचा हाहाकार! आज दिवसभरात 1571 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 38 जणांचा मृत्यू; शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 967 वर पोहोचली
Coronavirus in India (Photo Credits: IANS)

मुंबईमध्ये (Mumbai) कोरोना व्हायरसने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. मुंबईत आज दिवसभरात 1571 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 967 वर पोहोचली आहे. याशिवाय आज दिवसभरात मुंबईमध्ये 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील 5012 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत मुंबईत 734 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईमधील धारावी, दादर, आदी ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. धारावीत आज 44 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 242 वर पोहोचली आहे. तसेच धारावीत आतापर्यंत 56 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Coronavirus: दिलासादायक! राज्यात आज दिवसभरात सर्वाधिक 600 रुग्णांना डिस्चार्ज)

दरम्यान, आज राज्यात 2,347 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 63 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 33,053 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज सर्वाधिक 600 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.