Coronavirus: दिलासादायक! राज्यात आज दिवसभरात सर्वाधिक 600 रुग्णांना डिस्चार्ज
Coronavirus Outbreak | Photo Credits: IANS

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात आज एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. राज्यात आज दिवसभरात सर्वाधिक 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 7688 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे.

कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये मुंबई, पुणे,नाशिक, मालेगाव या भागातील रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडलं जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - BMC: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 44 नवे रुग्ण आढळले; आतापर्यंत 1 हजार 242 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग तर, 56 जणांचा मृत्यू)

दरम्यान, आज राज्यात 2,347 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 63 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 33,053 वर पोहोचला आहे. यापैकी 600 रुग्णांचा उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.