Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) येथील धारावी (Dharavi) परिसरात कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. धारावीत आज 44 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 242 वर पोहोचली आहे. तर, एकूण 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. येथील लोक घराबाहेर पडू नये, म्हणून या परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी आणि रात्री प्रत्येकी जेवणाच्या पाकिटांचे वितरण, विविध धान्य आणि आवश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या पाकिटांचे वाटप तसेच गरजवंतांना औषधांचाही पुरवठा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण हे मुंबई परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- कटेंनमेंट झोनमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर होणार कारवाई; लॉक डाऊनबाबत BMC ने उचलले कडक पाऊल

एएनआयचे ट्वीट-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने भारतासह संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. भारतातही कोरोना विषाणूचे जाळे आता संपूर्ण देशात पसरत चालले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात 31 मे पर्यंत लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 90 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 2 हजार 872 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 34 हजार 109 जण कोरोनामुक्त झाले आहेत.