Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईभोवती कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फास दिवसेंदिवस अधिकच आवळत चालला असून शहरात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 60 हजारांच्या वर गेली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 1269 नवे रुग्ण आढळले असून शहरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 64,068 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. आज दिवसभरात 114 नवे रुग्ण दगावले असून मुंबईत मृतांची एकूण संख्या 3423 वर पोहोचली आहे. सद्य घडीला मुंबईत 28,388 रुग्णांवर उपचार सुरु असून 32,257 रुग्ण बरे झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. आज दिवसभरात 401 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित हे मुंबईत असून देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 3827 रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,24,331 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

हेदेखील वाचा- धारावीत आज 17 नवे कोरोना रुग्ण; एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2151 वर पोहोचला

मुंबईत कोरोना व्हायरस ची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून योग्य ती काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

तर भारतातही कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दर दिवशी कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असून मागील 24 तासांतही 13,586 कोरोना बाधित नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 3,80,532 वर पोहचला आहे. त्यापैकी 1,63,248 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 2,04,711 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशात एकूण 12,573 कोरोनाग्रस्त रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.