मुंबई: धारावी मध्ये कोरोना बाधितांची संख्या 71; आज 11 नव्या रुग्णांची भर
Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई (Mumbai) शहरात कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट (Corona Hotspot) असलेल्या धारावी (Dharavi) परिसरात आज कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 71 झाली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) दिली आहे. आज मुंबईत 107 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 11 रुग्ण हे धारावी परिसरातील आहेत. धारावी हा दाटीवाटीचा परिसर असल्याने कोरोनाचा फैलाव जलद होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे धारावी परिसराचे निर्जुंकीकरण करण्यात आले असून घरोघरी जावून कोरोनाचे स्क्रिनिंग केले जात आहे. तसंच धारावी परिसर 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.

तसंच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  Hydroxychloroquine च्या गोळ्या मुंबईकरांना देण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या परिसरातील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी Hydroxychloroquine च्या गोळ्या देण्याचा निर्यण घेण्यात आला आहे. मुंबई, पुणे शहारातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. त्यामुळे या शहरांकडे राज्य सरकार विशेष लक्ष पुरवत आहे.

ANI Tweet:

महाराष्ट्र राज्यात आज 165 नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3081 वर पोहचला आहे. तर देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12000 च्या पार गेली असून आतापर्यंत देशात एकूण 414 कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे.