दिवाळी हा भारतातील एक मोठा उत्सव आहे. भारतीय लोक हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. जगभरातून अनेक लोक फक्त हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात. तसे पाहिले तर दिवाळी हा सण भारतात थोड्या फार फरकाने सर्वच ठिकाणी सारखी साजरी होते. मात्र देशात अशी काही ठिकाणे आहेत जिथली दिवाळी आयुष्यात एकदा तरी पहावीच. दिवाळी हा उत्सव कुटुंबासोबत साजरा करण्यात मजा आहे, मात्र तरी तुम्हाला दिवाळीसाठी काही हटके करायचे असेल तर यंदा दिवाळीमध्ये भारतातील या ठिकाणांना भेट नक्की द्या.
> कोलकाता (Kolkata) - दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते, परंतु कोलकातामधील संकल्पना थोडी वेगळी आहे. इतरांप्रमाणे फटके, रांगोळी, दिवे, खाण्यापिण्याचे जिन्नस असा सर्व गोष्टी इथे असतात. मात्रा इथे पूजा होते ती कालीमातेची. दिवाळीच्या काळात लोक दुर्गापूजेप्रमाणे कालीमातेचे पंडाल सजवतात. ही सजावट मोठी पाहण्यासारखी असते. भारतात हे दृश्य इतर कोणत्याही ठिकाणी दिसणार नाही.
> वाराणसी (Varanasi) – वाराणसीमधील दिवाळी ही भारतातील सर्वात खास दिवाळी आहे. या ठिकाणी तब्बल 15 दिवस दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. इथे देव दीपावली देखील साजरी केली जाते, ज्याला देवांची दीपावली देखील म्हणतात. यानिमित्ताने वाराणसीचे सर्व घाट सजविण्यात येतात. प्रत्येक घाटावर शेकडो दिवे जळत असतात. हे दृष्य पाहण्यासाठी आणि कॅमेर्यामध्ये कॅप्चर करण्यासाठी लोक दूरदूरून येतात. गंगेच्या रविदास घाट व राज घाट येथे भव्य पूजा आयोजित केली जाते. असा विश्वास आहे की, या रात्री, देव आकाशातून खाली उतरतात आणि गंगेच्या पवित्र पाण्यात डुबकी मारतात. वाराणसीची पूजा इतकी लोकप्रिय झाली आहे की, लोकांना आकर्षित करण्यासाठी दिवाळीबरोबरइथे च गंगा महोत्सवही साजरा केला जातो.
> गोवा (Goa) - गोवा आपले सुंदर समुद्रकिनारे आणि वर्षाच्या शेवटी होणाऱ्या पार्टीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु इथली दिवाळी आता लोकप्रिय होऊ लागली आहे. इथले मुख्य आकर्षण म्हणजे गावात नरका चतुर्दशीनिमित्त तयार होणार नरकासुराचे विशाल पुतळे. रात्री उशिरा या पुतळ्यांचे दहन होते. आतातर इथे मोठे आणि भव्य पुतळे उभारण्याची स्पर्धा देखील आयोजित केली जाते.
> जयपूर/उदयपुर - बहुतेक ठिकाणी धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी साजरी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुमच्याकडे दोन दिवस असतील तर तुम्ही दिवाळीच्या काळात राजस्थानच्या काही ठिकाणांना भेट देऊ शकता. दिवाळीच्या काळात राजस्थानच्या महत्वाच्या शहरांमध्ये मोठे बाजार भारतात. विविध प्रकारचे दिवे, हस्तकलेच्या वस्तू व इतर सजावटीच्या वस्तूंची रेलचेल पाहायला मिळते. दिवाळीच्या काळात राजस्थानात ऐतिहासिक ठिकाणी, मोठ मोठ्या महालांवर केलेली लाइटिंग हे इथले मुख्य आकर्षण आहे. जयपूरचा नाहरगड किल्ला असो किंवा उदयपुरातील सिटी पॅलेस असो प्रत्येक ठिकाणी ही रोषणाई पाहायला मिळते जी भारतात इतर कुठेही अनुभवटा येणार नाही.
> अमृतसर (Amritsar) - अमृतसर आणि पंजाबमध्ये दिवाळीचे स्वतःचे असे महत्व आहे, त्यामुळे इथे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. येथे काही ठिकाणी मोठ्या दिवाळी पार्टी देखील आयोजित केल्या जातात. दिवाळीच्या दिवशी इथे एक खास शीख उत्सव साजरा केला जातो, ‘बंदी छोड़ दिवस’. या दिवशी शीख धर्माचे 6 वे गुरु, हरगोविंद जी, जहांगीरच्या कैदेतून मुक्त होऊन परत पंजाब मध्ये आले होते. जेव्हा ते अमृतसरला ला पोहचले तेव्हा संपूर्ण गुरुद्वाराच्या आजूबाजूला दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक दिवाळीला अमृतसरच्या सुवर्ण मंदिराची शोभा पाहण्यासारखी असते.