
माथेरान (Matheran) हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो लोक माथेरानला भेट देण्यासाठी येतात. जर तुम्हीही माथेरानला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अहवालानुसार, 18 मार्च 2025 पासून माथेरान पर्यटकांसाठी अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. पर्यटकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी माथेरानमधील लोकांनी एकत्र येऊन माथेरान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
माथेरानच्या प्रवेशद्वारावर काही घोडे व्यापाऱ्यांकडून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक होऊ नये म्हणून, माथेरानमधील लोकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु तो अयशस्वी झाल्याने, माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने अखेर माथेरान बंदचे हत्यार उपसले आहे. माथेरान प्रशासन जोपर्यंत फसवणूक व्यवसाय थांबवत नाही, तोपर्यंत माथेरानमध्ये अनिश्चित काळासाठी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी प्रशासनाशी झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने, माथेरानमधील लोक बंदच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.
रायगड जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून माथेरान ओळखले जाते. या पर्यटन स्थळावर अनेक भागातील लोक काम करण्यासाठी येतात. यामध्ये कर्जत तालुक्यातून उदरनिर्वाहासाठी येणारे हातगाडी चालक, कुली आणि घोडेस्वार देखील आहेत. यातील काही घोडेस्वार पर्यटकांना दिशाभूल करतात आणि फसवतात असा आरोप माथेरानचे रहिवासी करत आहेत. येथे आलेल्या एका पर्यटकाने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला होता. समितीने म्हटले आहे, सुंदर माथेरानची बदनामी करणाऱ्या घोडेस्वारांवर येथील प्रशासनाने कारवाई करावी. यासाठी माथेरानमध्ये अनिश्चित काळासाठी बंद पुकारण्यात आला आहे. (हेही वाचा: Special Summer Vacation International Tours: प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई IRCTC ने जाहीर केले दुबई, श्रीलंका, नेपाळ आणि युरोपसाठी उन्हाळी विशेष टूर पॅकेजेस, जाणून घ्या सविस्तर)
याबाबत 27 फेब्रुवारी रोजी या आंदोलनाचे निवेदन महसूल विभाग, नगरपालिका, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आले. सोमवारी या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती, परंतु समितीने केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे समितीच्या लक्षात आले. प्रशासनाने हे गांभीर्याने घेतले नसल्याने माथेरान बचाव संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली. आता 19 दिवसांचा कालावधी देऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेर माथेरान बचाव संघर्ष समितीने माथेरान अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि 18 मार्चपासून माथेरान अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे.