
हिवाळा ओसरला की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे वेध लागतात. उन्हाळ्यात अनेकजण बाहेर फिरायला जाण्याची योजना आखतात. तुम्हीही जर यंदाच्या उन्हाळ्यात परवडणाऱ्या दरात परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने त्यांच्या पश्चिम विभागीय मुंबई कार्यालयामार्फत, परदेशात सुट्टीसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्टीतील विशेष आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजेसची घोषणा केली आहे.
यामध्ये ‘ऑल-इन्क्लूसिव्ह युरोप विथ लंडन’ टूर पॅकेजचा समावेश आहे, जो 9 मे 2025 ते 24 मे 2025 पर्यंत चालेल व याचे शुल्क 4,12,400 रु.पासून सुरु होते. ‘डॅझलिंग दुबई’ टूर पॅकेज 10 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 पर्यंत नियोजित आहे. याचे शुल्क 76,900 रु. प्रती व्यक्तीपासून सुरु होते. ‘मिस्टिकल नेपाळ’ चे दोन टूर पॅकेज 14 एप्रिल 2025 आणि 7 मे 2025 साठी नियोजित आहेत. याचे शुल्क 46,600 रु. आहे. याव्यतिरिक्त, ‘श्री रामायण यात्रा – श्रीलंका’ टूर पॅकेज 6 मे 2025 ते 12 मे 2025 पर्यंत होणार आहे व याचे शुल्क 65,000 रु. पासून आहे.
ग्रुप जनरल मॅनेजर (पश्चिम क्षेत्र) गौरव झा म्हणाले, हे टूर पॅकेज विशेषतः तयार केलेले आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ बनवण्याचा उद्देश आहे आणि त्याचबरोबर ते त्रासमुक्त, सर्वसमावेशक अनुभव देखील प्रदान करतात. एका अधिकाऱ्याच्या मते, या आंतरराष्ट्रीय टूरमध्ये परतीची विमान तिकिटे, स्थानिक प्रवास, पर्यटन स्थळे, सर्व जेवण, प्रवेश शुल्क, निवास, व्हिसा/परमिट, टूर गाईड, प्रवास विमा आणि जीएसटी यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Mahabaleshwar Tourism Festival: महाबळेश्वर येथे 26 ते 28 एप्रिल दरम्यान भव्य पर्यटन महोत्सवाचे आयोजन; पर्यटकांना होणार प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख)
आयआरसीटीसीचा दावा आहे की, त्यांचे पॅकेजेस बाजारातील समान ऑफरच्या तुलनेत परवडणाऱ्या किमतीचे आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बजेटपेक्षा जास्त खर्च न होता उच्च दर्जाचे आतिथ्य मिळते याची खात्री होते. आयआरसीटीसीच्या मते, उन्हाळी सुट्ट्या जवळ येत असल्याने, या टूर पॅकेजेसना जास्त मागणी असण्याची अपेक्षा आहे. इच्छुक व्यक्ती आयआरसीटीसीच्या वेबसाइट (www.irctctourism.com), अधिकृत एजंट्सद्वारे त्यांच्या ट्रिप बुक करू शकतात.