
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी दोन दिवसांच्या चीन (China) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील महत्त्वाच्या बैठकीत भाग घेतला. परराष्ट्र सचिव आणि चीनचे उप परराष्ट्र मंत्री यांच्यातील संवादासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यात संबंध अधिक दृढ करण्यासाठी काही आवश्यक पावले उचलण्यावर सहमती झाली. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सोमवारी ही माहिती दिली. मंत्रालयानुसार, बैठकीदरम्यान, दोन्ही देशांनी यावर्षी उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा (Kailash Mansarovar Yatra) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यमान करारांतर्गत आवश्यक व्यवस्थांवर चर्चा केली जाईल.
दोन्ही देशांमधील थेट हवाई सेवा-
याव्यतिरिक्त, भारत आणि चीनने दोन्ही देशांदरम्यान तज्ज्ञ स्तरावरील यंत्रणेची लवकर बैठक आयोजित करण्यास सहमती दर्शविली आहे ज्यामुळे हवामान डेटाची देवाणघेवाण आणि सीमापार नद्यांशी संबंधित इतर सहकार्यावर चर्चा होईल. यासोबतच दोन्ही देशांमधील थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासाठी दोन्ही देशांचे तांत्रिक अधिकारी लवकरच भेटून नवीन आराखडा तयार करतील.
भारत-चीन तणाव-
2020 पासून भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. त्याच वर्षी जूनमध्ये, पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांदरम्यान लष्करी संघर्ष झाला, ज्यामध्ये दोन्ही बाजूंचे नुकसान झाले. त्यानंतर भारताने अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. चिनी कंपन्यांकडून येणाऱ्या गुंतवणुकीवर देखरेखही वाढवण्यात आली. प्रवासी विमानसेवा बंद करण्यात आली, परंतु मालवाहू विमानांची थेट सेवा कायम राहिली. मात्र आता दोन्ही देशांनी राजनैतिक प्रयत्नांना आणखी बळकटी देण्याचे आणि परस्पर विश्वास आणि समज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. (हेही वाचा: Illegal Indian Migrants in US: अमेरिकेतून 18,000 अवैध भारतीय स्थलांतरितांना परत पाठवले जाणार; सरकार करणार Donald Trump प्रशासनाला सहकार्य- Reports)
कैलाश मानसरोवर यात्रा-
दरम्यान, कैलाश मानसरोवर यात्रा ही एक पवित्र तीर्थयात्रा आहे, जी भारत, चीन (तिबेट) आणि नेपाळ यांच्या सीमेजवळील हिमालयातील पवित्र कैलाश पर्वत आणि मानसरोवर तलावाला भेट देण्यासाठी केली जाते. हिंदू, बौद्ध, जैन धर्मीय लोकांसाठी हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते. कैलाश पर्वतावर भगवान शिव व माता पार्वती वास करतात असे मानले जाते. सध्या कैलास पर्वत चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात आहे.
कैलास मानसरोवर यात्रेसाठी तुम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करू शकता. प्रवासासाठी, पासपोर्ट आकाराचा फोटो, पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाचा फोटो, फोन नंबर आणि ईमेल सोबत ठेवा. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी किमान 25 दिवस लागतात. यासाठी तुम्हाला 1.5 ते 3 लाख रुपये खर्च येऊ शकतो. कैलास मानसरोवर यात्रेची सुरुवात हा भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये मैलाचा दगड आहे.