IRCTC Bharat Darshan: 30 मे पासून सुरु होणार आयआरसीटीसी भारत दर्शन टुर; पहा कसे, कुठून कराल बुकींग
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

एप्रिल महिन्यात परीक्षा संपतील आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरु होईल. सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा तुमचा सर्वांचाच प्लॅन असेल. त्यासाठीच तुमच्याकडे विविध पर्यायही असतील. पण प्रवाशांच्या सेवेसाठी आयआरसीटीसीने भारत दर्शन पॅकेज सुरु केले आहे. या पॅकेजमध्ये भारतीय रेल्वे तर्फे विविध सुविधा देण्यात येत आहेत. भारत दर्शनच्या या पॅकेजमध्ये भारतातील तीन मोठ्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

कशी असेल टूर?

भारत दर्शन ही टूर 8 रात्र आणि 9 दिवसांची असेल. यात गुजरात येथील ओखा येथून 30 मे 2019 पासून ही यात्रा सुरु होईल. या टुरमध्ये मथुरा, ऋषिकेश, हरिव्दार, अमृतसर, वाघा बॉर्डर आणि वैष्णव देवी या ठिकाणांचा समावेश आहे. तुम्ही ही ट्रेन ओखा, द्वारका, राजकोट, जामनगर, सुरेंद्र नगर, विरमगाम, आनंद, वडोदरा, साबरमती, गोधरा आणि रतलाम येथून पकडू शकता. त्यामुळे गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील प्रवाशांना या टूरचा अधिक चांगला लाभ घेता येईल.

सुविधा

ट्रेनमध्ये थर्ड एसी शिवाय स्लीपर कोचची देखील व्यवस्था आहे. स्लीपर क्लासच्या टूरची किंमत 8505 रुपये असून एसी क्लासमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला 10,395 रुपये मोजावे लागतील. भारत दर्शन टूर दरम्यान रात्रीच्या राहण्याची व्यवस्थाही करण्यात येईल. याशिवाय बाहेर फिरण्यासाठी टुरिस्ट बस उपलब्ध करुन देण्यात येतील. तसंच शाकाहारी भोजनाचीही सोय करण्यात आली आहे.

कसे कराल बुकींग?

रेल्वेच्या प्रत्येक कोचमध्ये सुरक्षा व्यवस्था असेल. तसंच आयआरसीटीसीचे अधिकारी देखील ट्रेनमध्ये असतील. हे टूर पॅकेज बुक करण्यासाठी https://www.irctctourism.com वेबसाईटला भेट द्या. तसंच ऑफलाईन बुकिंगसाठी टूरिस्ट फेसिलिटेशन सेंटर किंवा तुमच्या भागातील IRCTC च्या ऑफिसला भेट द्या.