बहुप्रतिक्षित, विविध कलात्मक अभिव्यक्ती दर्शविणाऱ्या ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ला (I Love Panchgani Festival) आजपासून सुरुवात होणार आहे. आज म्हणजेच 17 ते 19 जानेवारीदरम्यान तीन दिवस हा उत्सव चालणार आहे. हा महोत्सव 2015 पासून दरवर्षी आयोजित केला जात आहे. या फेस्टिव्हलचा उद्देश पर्यटनाला चालना देणे, स्थानिक व्यवसाय वाढवणे, स्थानिकांसाठी संधी उपलब्ध करून देणे आणि नवीन सुविधा प्रदान करणे हा आहे. या महोत्सवामुळे महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून संबोधले जाणारे पाचगणी व महाबळेश्वर हे ठिकाण स्थानिक आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे.
पाचगणी येथील संजीवन विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत आज दुपारी 4 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवात कला प्रदर्शने, लाइव्ह बँड, नृत्य सादरीकरण, मनोरंजन पार्क आणि विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससह इतर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असेल. याव्यतिरिक्त, आज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत, पर्यटक रिवाईन हॉटेलजवळ रोमांचक पॅराग्लायडिंग स्टंटचा आनंद घेऊ शकतात. (हेही वाचा: State-Level Tourism Festival: लवकरच महाबळेश्वर-पाचगणी परिसरात आयोजित केला जाणार तीन दिवसीय राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव; मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती)
पुढील दोन दिवसांत, या महोत्सवात युवा महोत्सव, फॅशन शो आणि अनेक रोमांचक कार्यक्रमांचे प्रदर्शन होणार आहे. 18 जानेवारी रोजी, पारंपारिक ढोल पथके, तसेच प्रसिद्ध नृत्यांगना फुलवा खामकर यांच्या नृत्य सादरीकरणासह, 'ड्रम्स सर्कल' होणार आहे. युथ फेस्टिव्हलमध्ये आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचा समावेश असेल. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, 19 जानेवारीला खजिन्याची शोधाशोध, महिला आणि पुरुष यांच्यातील टग-ऑफ-वॉर गेम आणि भव्य रॅफल ड्रॉ होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅफलची बक्षिसे लावण्यात आली असून त्यामुळे चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.