Cross-Border Love Story: सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेने देशांच्या सीमा ओलांडून सचिन मीणा याच्यासोबत दिल्ली येथील ग्रटर नोएडा येथे संसार थाटला. काहीशी अशीच पण जरा हटके आणखी एक प्रेम कहाणी पुढे येत आहे. टुरीस्ट व्हीसावर भारतात आलेल्या एका श्रीलंकन महिलेने भारतातील आपल्या फेसबुक फ्रेंड सोबत विवाह केला आहे. त्यांच्या विवाहाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विक्नेश्वरी शिवकुमारा (Vikneshwariy Sivakumara) असे या 25 वर्षी महिलेचे नाव आहे. तिने आंध्र प्रदेशातील वेंकटगिरीकोटा (Venkatagirikota) शहरातील 28 वर्षीय प्रियकर लक्ष्मण ( Laxman) याच्याशी लग्न केले. दोघांचीही भेट फेसबुकवर झाली होती.
विक्नेश्वरी शिवकुमारा ही श्रीलंकन महिला पर्यटक व्हिसावर भारतात आली आहे. तिच्या व्हिसाची मुदत 6 ऑगस्ट रोज संपत आहे. इमिग्रेशन नियमांनुसार, चित्तूर जिल्हा पोलिसांनी विकनेश्वरीला नोटीस बजावली आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, ती 8 जुलै रोजी आंध्र प्रदेशात आली. लक्ष्मण याच्यासोबत ती 20 जुलै रोजी एका मंदिरात विवाहबद्ध झाली. विक्नेश्वरी आणि लक्ष्मण यांची 2017 मध्ये फेसबुकवर भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले, असे हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे. लक्ष्मण यांच्या घरच्यांच्या आशीर्वादाने दोघांचा विवाह झाला.
विक्नेश्वरी हिने भारतीय नागरिकत्व मिळावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. परिणामी तिचा व्हीसा वाढवला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. दरम्यान, संभाव्य कायदेशीर गुंता टाळण्यासाठी पोलिसांनी या जोडप्याला रितसर विवाहाची नोंद करण्यास सांगितले आहे. दरम्यान, या जोडप्याला जिल्हा पोलिस अधीक्षक वाय रिशांत रेड्डी यांनी विक्नेश्वरी यांना भारतीय नागरिकत्व मिळविण्याची प्रक्रिया आणि निकषांची माहिती दिली, असे समजते.