Pu La Deshpande Birthday. (Photo Credits: File Image)

P.L.Deshpande Birth Anniversary 2023: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांची आज जयंती (P.L.Deshpande Birth Anniversary). पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात 8 नोव्हेंबर 1919 साली झाला. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे फक्त नाव नसून ती एक भावना आहे. आपल्या कलाकृतीतून अजरामर साहित्य निर्माण करणाऱ्या पु.ल. देशपांडे यांनी मराठी साहित्याला खूप उंचावर नेऊन ठेवलेले आहे. म्हणूनच मराठी विनोदी लेखक, कथाकार, अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार, गायक, वक्ते अशा अनेक पैलूंचे हे व्यक्तिमत्व आजही अनेकांसाठी आदराचे स्थान आहे.

पु.ल.देशपांडे यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत भरभरून काम केले. आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना, भोवताली भेटणारी माणसे यांचे ते सूक्ष्म निरीक्षण करत असत आणि त्या साऱ्या लकबी त्यांच्या स्मृतिपटलावर अचूक टिपल्या जात असत. पुढे याच गोष्टी आपल्याला त्यांच्या कलाकृतींमध्ये पाहायला मिळत असत. पु.लं. चा शब्दनिष्ठ, कोटीनिष्ठ विनोद हा अभिजात गुण होता. तो कुणालाही दुखावणारा, कुणाच्याही व्यंगावर बोट ठेवणारा नव्हता. समयसूचकतेतून सहज सूचलेल्या विनोदाचा विचार करण्यास भाग पाडणारे व्यक्तीमत्व म्हणजे पु.ल.देशपांडे.

तर आज पु.ल.देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त पाहूयात त्यांचे काही व्हिडिओ जे तुम्हाला नक्कीच खळखळुन हसवतील.

दरम्यान, भारतामध्ये स्टॅन्ड अपची कॉमेडीची सुरुवात करण्याचे खरे श्रेय हे पुलंनाच जाते. तब्बल दोन-दोन तासांची एकपात्री नाटके त्यांनी रंगमंचावर सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठवले आहे. तर अशा या महान अवलियाबाबत सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांनी काढलेले गौरवोद्गार अगदी सार्थ आहेत-

‘पुलस्पर्श होताच, दुःखे पळाली,

नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,

निराशेतूनी माणसे मुक्त झाली,

जगू लागली, हास्यगंगेत न्हाली'