ओडिशा (Odisha) ची तीर्थ नगरी जगन्नाथपुरी येथे भगवान जगन्नाथ ची विश्वप्रसिद्ध रथ यात्रा (Jagannath Yatra) आजपासून (4 जुलै) सुरू होणार आहे. दरवर्षी जगन्नाथ मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ यांच्यासह त्यांचे भाऊ बलराम, बहिण सुभद्रा यांची रथयात्रा (Rath Yatra) निघते. या रथयात्रेमध्ये सामील होण्यासाठी जगभरातील श्रद्धाळू लोक पुरीमध्ये दाखल झाले आहेत. पुरीसोबतच देशात इतर भागांमध्ये देखील प्रतीकात्मक रूपातील रथयात्रेचे आयोजन केले जाते. या उत्सवाला फार मोठे धार्मिक महत्व आहे. दरवर्षी भगवान जगन्नाथ एक आठवडा आपल्या मावशीच्या घरी रवाना होतात, ज्याचा प्रवास या रथ यात्रेद्वारे साजरा केला जातो. भगवान जगन्नाथाची ही 142 वी रथयात्रा असेल.
भगवान जगन्नाथ यांच्या मावशीचे घर हे गुंडिचा देवीचे मंदिर आहे. या यात्रेची तयारी सकाळीपासूनच सुरू होते आणि दिवसभर अनेक पूजा-विधी, रीति-रिवाज संपन्न होतात. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता रथ काढण्याचे काम सुरू होते. दर वर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष च्या द्वितीयेला रथ यात्रा आयोजित केली जाते. ही यात्रा शुक्ल पक्षच्या 11 व्या दिवसापर्यंत म्हणजेच, जगन्नाथ यांच्या घरी परतण्यापर्यंत चालते. वसंत पंचमीपासूनच रथ निर्मितीचे कार्य सुरू होते. जगन्नाथ यात्रेसाठी लिंबाच्या झाडापासून विशाल रथ बनवला जातो, यासाठी कोणत्याही धातूचा वापर केला जात नाही.
(हेही वाचा: जुलै महिन्यात भारतात साजरे होतात हे उत्सव; पावसाळ्यात फिरण्यासोबत जाणून घ्या देशाची संस्कृती)
गृहमंत्री बनल्यानंतर अमित शाह आपल्या पहिल्या गुजरात दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी भगवान जगन्नाथ यांच्या 142 व्या रथयात्रेची पूजा केली. अमित शाह यांनी लाखो भक्तांच्या सहवासात सकाळी 4 वाजता जगन्नाथ मंदिरामध्ये आरती केली. पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाकडून या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परंपरा आणि त्याचे महत्व आणि कार्यक्रमांची माहिती देणारी वेबसाईट सुरू केली आहे.