
अल्झायमर हा मेंदूच्या आरोग्याशी निगडीत आजार आहे. अनेकदा विस्मृती या आजाराकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र कालांतराने या आजाराच्या गंभीर स्वरूपाची आपल्याला जाणीव होते. उतरता वयात विस्मृती होणं सामान्य आहे परंतू हा त्रास गंभीर टप्प्यावर पोहचण्यापूर्वी काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचे आहे.
अल्झायमर या आजारावर नियंत्रण ठेवायचं असेल तर वैद्यकीय उपचारांसोबतच आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील गरजेचे आहे. काही पदार्थ नियमित आहारात असल्यास उतारवयात अल्झायमरचा धोका आपोआपच कमी होण्यास मदत होते.
अल्झायमरचा धोका कमी करणारे सुपरफूड्स
हिरव्या पालेभाज्या
पालक, ब्रोकोली अशा हिरव्या भाज्यांचा आहारातील समावेश वाढवा. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी घटक, पोषणतत्त्व मुबलक प्रमाणात असतात. मेंदूच्या कार्याला चालना देण्यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळेस हिरव्या भाज्या आहारात ठेवा.
सुकामेवा
मेंदूच्या आरोग्यासाठी सुकामेवा अत्यंत फायदेशीर आहे. यामधील फायबर, फॅक्ट्स, अॅन्टीऑक्सिडंट घटक मेंदूतील पेशींना मजबूत ठेवण्यास मदत करतात.
मासे
मांसाहार आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मेंदूच्या कार्याला चालना देण्यासाठी मासे अत्यंत गुणकारी आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, आठवड्यातून किमान एक दिवस मासे खाणं मेंदूच्या आरोग्याला मजबूत ठेवण्यास फायदेशीर आहे.
बेरीज
भाज्यांप्रमाणेच फळंदेखील आहारात आवश्यक आहेत. नियमित ऋतूमानानुसार बाजारात उपलब्ध होणारी फळं आहारात ठेवणं आवश्यक आहे. यामध्ये ब्लुबेरीज आठवड्यातून किमान दोनदा खाल्ल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
बिन्स
आहारात बिन्सचा समावेश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. यामध्ये फायबर,प्रोटीन घटक मुबलकप्रमाणात असतात. यामध्ये कॅलेरीज कमी प्रमाणात असतात. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, आहारात किमान तीन वेळेस बिन्सचा समावेश केल्याने मेंदूच्या कार्याला चालना मिळते. यामुळे अल्झायमरचा धोकादेखील कमी होतो.