One Rupee Clinic (संग्रहित संपादित प्रतिमा)

आता अवघ्या 10 रुपयांत मधुमेहाची चाचणी (Sugar Test) करता येणार आहे. दैनंदिन प्रवासी आणि कार्यालयीन प्रशासनाच्या सुविधेसाठी 'वन रुपी क्लिनिक' (One Rupee Clinic) 1 जूनपासून सर्व केंद्रांवर सुरू होणार आहे. सध्या ही केंद्रे ठाणे, कळवा, कुर्ला, भांडुप, टिटवाळा, बदलापूर, उल्हासनगर, चेंबूर, मानखुर्द, पनवेल, ग्रँट रोड, परळ, विक्रोळी, अंधेरी, कांदिवली, मालाड, दहिसर, मीरा रोड, नयागाव, विरार, पालघर आणि डहाणू रोड अशा एमएमआरच्या 25 उपनगरीय रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहेत.

याबाबत वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ राहुल घुले म्हणाले की, ‘जीवनशैलीतील बदलांमुळे मेट्रो शहरांमध्ये मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्याची लक्षणे हळू हळू दिसतात, त्यामुळे भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच हे डिटेक्ट  होणे आवश्यक आहे. परंतु अशा चाचण्यांच्या किमती वाढल्यामुळे फार कमी लोक या टेस्ट्स करून घेतात.’ म्हणूनच सर्वांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून, वन-रुपी क्लिनिकची स्थापना डॉ. राहुल घुले यांनी 2017 मध्ये केली होती. सध्या हे क्लिनिक मुंबई महानगर प्रदेशातील 25 स्थानिक रेल्वे स्थानकांवर आहे.

डॉ राहुल घुले म्हणतात, ‘आमची उच्च पात्र वैद्यकीय टीम प्रत्येकासाठी, विशेषत: स्थानिकांना आणि प्रवाशांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी चोवीस तास काम करते. 10 रुपये ते 100 रुपयांपर्यंतच्या सुधारित कमी किमतीच्या निदान चाचण्यांसह सल्लामसलत शुल्क म्हणून फक्त एक रुपयाचे टोकन आकारले जाते. यामुळे पैशाची कमतरता असलेल्या सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. रेल्वे अपघात झाल्यास ही आरोग्य केंद्रे आपत्कालीन युनिट्स म्हणूनही काम करतात.’ (हेही वाचा: देशात ओमायक्रॉनच्या BA.4 व्हेरिएंटनंतर आता BA.5 प्रकाराची पुष्टी; तामिळनाडू आणि तेलंगानामध्ये आढळले रुग्ण)

दरम्यान, 2021 मध्ये जारी केलेल्या खाजगी प्रयोगशाळेतील अहवालानुसार 2017 ते 2021 दरम्यान तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 35 टक्क्यांहून अधिक नमुने मधुमेहासाठी सकारात्मक होते.