Moving Gym for Women: महिलांच्या शारीरिक तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी मुंबईमध्ये सुरु होणार 'फिरती जिम'; जाणून घ्या काय आहे उपक्रम
Exercise | (Photo Credits: PixaBay)

कोरोना विषाणू महामारीनंतर बऱ्याच लोकांना व्यायामाचे आणि तंदुरुस्त राहण्याचे महत्व समजले. त्यानंतर अनेकांनी नियमितपणे जिमला जायला सुरुवात केली. आता शारीरिक तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी मुंबईतील महिलांना लवकरच मोबाईल जिम म्हणजेच फिरती जिम (Mobile Gym) उपलब्ध होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) महिलांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यायामशाळा उपकरणांनी सुसज्ज बस सुरू करण्याची योजना आखली आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारी आव्हाने ओळखून, जिथे व्यक्तींना आरोग्याला प्राधान्य देणे कठीण जाते, विशेषत: नोकरदार महिला आणि दैनंदिन दिनचर्येत अडकलेल्या गृहिणींसाठी मोबाइल जिम सुरू करून या समस्येचे निराकरण करण्याचे बीएमसीचे उद्दिष्ट आहे.

काही वर्षांपूर्वी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत ओपन जिमची संकल्पना मांडली होती. शहराच्या विविध भागात खुल्या जिमची स्थापना होऊनही अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याने उपकरणांची देखभाल दुरुस्तीची आता गरज आहे. त्यानंतर उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘महिलांसाठी मूव्हिंग जिम’ ची कल्पना मांडली होती. या उपक्रमाला निधी देण्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समिती (DPDC) निधी, राज्य सरकारच्या निधीतून पैसे वाटप केले जातील.

या योजनेत मुंबई उपनगरातील झोपडपट्टी भागात प्रायोगिक तत्त्वावर मोबाइल जिम तैनात करण्याचा समावेश आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये बदल करून तिला व्यायामशाळेमध्ये रुपांतरीत केले जाईल. यामध्ये महिला चालक, एक महिला अटेंडंट आणि एक महिला ट्रेनर असेल. महिला प्रशिक्षक महिलांना शारीरिक तंदुरुस्तीबद्दल शिक्षित करतील, माहिती सामायिक करतील आणि त्यांना सोप्या व्यायामाद्वारे मार्गदर्शन करतील. या उपक्रमामध्ये विशेषतः झोपडपट्टी भागातील महिलांना लक्ष्य केले जाणार आहे. मोबाईल जिम दररोज त्याचे स्थान बदलेल, विविध परिसरांमध्ये पोहोचेल. (हेही वाचा: Global Public Health Concern: वाढता 'एकटेपणाला' हा जागतिक आरोग्यासाठी धोका, होऊ शकते 15 सिगारेट ओढण्याइतके नुकसान- WHO)

महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीएमसी बसमध्ये बदल करण्यासाठी आणि जिमची उपकरणे बसवण्यासाठी 80 लाख रुपये खर्च करणार आहे. तसेच पुढील तीन वर्षांसाठी जिमच्या देखभालीसाठी 1.42 कोटी रुपये खर्च करणार आहेत.