वातावरणातील प्रदूषण, प्रखर सूर्यप्रकाश, कामाची धावपळ, अपुरी झोप यामुळे मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्वचा अधिक संवेदनशील असल्याने त्वचा काळवंडते, निस्तेज होते किंवा त्वचेवर काळे चट्टे पडतात. आपल्यापैकी अनेकजणींना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी बाजारात अनेक सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत. परंतु, बाजारात मिळणाऱ्या या सौंदर्यप्रसाधनांपेक्षा घरगुती उपाय करणे अधिक सुरक्षित असते.तर जाणून घेऊया त्वचा ब्लिच करण्यासाठी काही घरगुती उपाय: (डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी हे आहेत 5 सोपे उपाय)
लिंबाचा रस
# ब्लिचिंग करण्यासाठी लिंबू हा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. लिंबाच्या रसातील अॅस्कॉर्बिक अॅसिड किंवा 'व्हिटॅमिन सी' अँटिऑक्सिडंटस् प्रमाणे कार्य करून त्वचेचा रंग उजळण्यास मदत करतात.
# अर्ध्या लिंबाचा रस एका कापसाच्या बोळ्यावर घ्यावा आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावावा. तुम्ही कापलेले लिंबूही थेट त्वचेवर लावू शकता.
# एक तासाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
# लिंबाचा रस लावल्यानंतर थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, अन्यथा त्वचा अधिक जास्त काळवंडू शकते.
# याशिवाय तुम्ही लिंबाच्या रसाबरोबर हळद किंवा टोमॅटोचा गरही घेऊ शकता.
दूध
# दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. तसेच थंडगार दूधाने डार्क सर्कल्सची समस्याही दूर होण्यास मदत होते.
# रात्री झोपताना कापसाच्या बोळ्यावर निरसे/कच्चे दूध घेऊन ते काळवंडलेल्या त्वचेवर लावावे.
# ते रात्रभर सुकू द्यावे. सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने धुवावे.
दही
# दही दुधापासून बनलेले असल्याने त्यामध्येही लॅक्टिक अॅसिड असते. त्यामुळे दुधाप्रमाणेच दह्यामुळेही त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
# 1 चमचा ओट्सच्या पिठात लिंबाचे काही थेंब मिसळावे.
# यात दही मिसळून घट्ट पेस्ट करून काळवंडलेल्या त्वचेवर लावावी.
# 15-20 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने त्वचा धुवावी.
संत्र
# लिंबाच्या रसाप्रमाणेच संत्र्याच्या रसामध्येही ब्लिचिंग करणारे घटक असतात. त्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यासाठी संत्र्याच्या रसाचा उपयोग केला जातो.
# 2 टेबलस्पून संत्र्याच्या रसात चिमूटभर हळद मिसळून पेस्ट करावी.
# झोपण्यापूर्वी ही पेस्ट काळवंडलेल्या त्वचेला लावावी व सकाळी उठल्यावर धुवावी.
मध
# मधामध्ये एनेझाइम हा घटक असल्याने त्वचा मऊ व चमकदार होण्यास मदत होते. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी चेहऱ्यावर मध लावण्याआधी पॅचटेस्ट करुन घ्यावी.
# मध, लिंबाचा रस आणि दूधपावडर समप्रमाणात घेऊन त्यांचे मिश्रण करून त्यात थोडी भिजवलेल्या बदामांची पेस्ट मिसळावी.
# हे मिश्रण काळवंडलेल्या त्वचेवर लावावे.
# सुकल्यावर कोमट पाण्याने धुवावे.
कोरफड
# कोरफड ही बहुगुणी असल्यामुळे त्वचा, केस यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.
# कोरफडाच्या पानाचे साल काढून जेलीसारखा दिसणारा गर काळवंडलेल्या त्वचेवर लावावा.
# 30 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवावा.
हे घरगुती उपाय नियमित केल्यास त्वचेचा पोत सुधारुन त्वचा मऊसूद, टवटवीत व तजेलदार होण्यास नक्कीच मदत होईल.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)