डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी हे आहेत 5 सोपे उपाय
Dark Circle (Photo Credits: File)

घड्याळ्याच्या काट्यावर चालणा-या आणि धकाधकीचे आयुष्य जगणा-या लोकांना शरीरासंबंधी वेगवेगळ्या समस्या भेडसावत असतात. त्यात झोप पूर्ण न होणे, अॅसिडीटी होणे, डोकेदुखी, पोटदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या तर आता अगदी रोजच्या झाल्या आहेत. या समस्यांमध्ये अशी एक समस्या आहे जी मुख्यत्वे झोप पुर्ण न झाल्याने होते ती म्हणजे डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे. झोप पुर्ण न होणे, खाण्यामध्ये पौष्टिक आहाराचा समावेश नसणे या मुळे ही समस्या अनेकांना भेडसावत असते.

या समस्येपासून सुटका करुन घेण्यासाठी आपण नानाविध असे उपाय करत असतो. मात्र त्या सर्वांचा समाधानकारक असा परिणाम मिळत नाही. जाणून घ्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्याचे 5 सोपे उपाय-

1. बदाम तेल- नेहमी झोपण्यापूर्वी बदाम तेल घेऊन ते डोळ्याखाली आलेल्या काळ्या वर्तुळावर फिरवून छान मसाज करावा. रात्रभर हे तेल असेच ठेवा. सकाळी उठल्यावर साध्या पाण्याने आपला स्वच्छ धुऊन घ्यावा.

2. जायफळ आणि चंदन पावडरची पेस्ट- जर तुमची त्वचा तेलकट असेल तर रात्री झोपताना जायफळ आणि चंदन पावडर सम प्रमाणात घेऊन त्याची पाण्यामध्ये पेस्ट करावी. हे पेस्ट डोळ्याखालील काळ्या भागावर लावून रात्रभर ठेवा. सकाळी उठल्यावर साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.

3. मसूर डाळ आणि गुलाब पाणी- 2 ते 3 चमचे मसूर डाळ घेऊन त्यात गुलाबपाणी एकत्र करावे. रात्रभर ही डाळ गुलाबपाण्यात भिजू द्यावी. सकाळी आपल्याला मसूरडाळ फुगलेली दिसेल. आता त्या मिश्रणातील अतिरिक्त गुलाबपाणी वेगळे करा . तसेच ती फुगलेली मसूर डाळ हाताने किंवा चमच्याने बारीक करा. बारीक केलेले हे मिश्रण डोळ्याखालील भागावर लावा. 10 ते 15 मिनिटे हा लेप ठेवा. नंतर मिश्रण लावलेल्या भागावर अर्धा कापलेला लिंबू फिरवावा. त्यानंतर कोमट पाण्याने तुमचा शेअर धुऊन घ्यावा. पंधरा दिवस हा उपाय केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे निघून जातील.

4. बटाटा- डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे लवकरात लवकर घालवायची असतील तर बटाट्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने डोळ्यांवर लावावा. यातही कापूस या रसात भिजवून तो डोळ्यांवर ठेवावा. १० मिनिटांसाठी हा कापूस असाच डोळ्यांवर ठेवा आणि नंतर डोळे धुवून टाका.

5. टोमॅटो- एक लहान चमचा लिंबू रस आणि लहान टोमॅटोची पेस्ट एकत्र करुन ते मिश्रण डोळ्याखाली लावावे. हे मिश्रण १० मिनीटे डोळ्यांवर ठेऊन त्यानंतर पाण्याने धुवावे. दिवसातून साधारण दोनवेळा हा प्रयोग केल्यास त्याचा फायदा होतो. याबरोबरच टोमॅटो, लिंबाचा रस आणि पुदीना यांचा रस प्यायल्यासही काळी वर्तुळे कमी होण्यास फायदा होतो.

हेही वाचा- कोल्हापूर: गेम खेळताना मोबाईलचा स्फोट झाल्याने मुलाने डोळा गमावला

हे उपाय सातत्याने 15 दिवस केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमची डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील. डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी भरमसाट मेकअप करण्यापेक्षा हे घरगुती उपाय केल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतील.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)