जॉर्ज फर्नांडिस दीर्घकाळापासून होते 'अल्जाइमर'ने ग्रस्त; नेमकी काय आहेत याची लक्षणे, कारणे आणि बचावात्मक उपाय?
Alzheimer's disease (Photo Credits: Pxhere)

अल्जायमर (Alzheimer)  हा एक मेंदूचा आजार आहे. अल्जायमर म्हणजे स्मृतीभ्रंश. त्यामुळे अल्जायमरने ग्रस्त व्यक्तीची स्मृती हळूहळू लोप पावत जाते. हा आजार अधिकतर मध्यम वयात किंवा वृद्धावस्थेत होतो. या आजारात व्यक्तीची विचार करण्याची, समजून घेण्याची शक्ती कमी होते. याचा थेट परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजावर होतो. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास हा आजार गंभीर रुप धारण करु लागतो. आजच  निधन झालेले भारताचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस हे अल्जायमर या आजाराने त्रस्त होते.

या आजारात मेंदूच्या पेशी डी-जनरेट होतात. हा आजार पूर्णपणे बरा करणारे उपाय उपलब्ध नसल्याने समस्या अधिकच वाढत जाते. जाणून घेऊया या आजाराची कारणे, लक्षणे आणि बचावात्मक उपाय....

आजाराची कारणे

अनुवंशिकता, नैराश्य, डोक्याला मार लागणे, उच्च रक्तदाब आणि स्थुलता यामुळे हा आजार जडू शकतो.

आजाराची लक्षणे

पुन्हा पुन्हा तेच तेच बोलणे, बेचैनी, चिडचिडेपणा, विसरणे, मुड स्विंग्स, एकटेपणा ही या आजाराची लक्षणे असून याकडे दुर्लक्ष न करता वेळीच न्युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

गोष्टी विसरणे, विचार करणे किंवा समजून घेणे अवघड होणे, मानसिक भ्रम, एकाग्रता कमी होणे, गोष्टींचे आकलन न होणे, लोकांची ओळख पटणे कठीण होणे यांसारखी लक्षणे या आजारात दिसून येतात. अनेकदा निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होतात. तर बोलताना अडखळणे या अडचणींचा सामना अल्जायमरने ग्रस्त व्यक्तीला करावा लागतो. (विसरण्याची सवय असेल तर दररोज करा व्यायाम!)

बचावात्मक उपाय

स्मृतीभ्रंश होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच योग्य आहारासह काही विशेष सवयी असणे गरजेचे आहे. मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी हंगामी फळे, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. त्याचबरोबर मेंदूच्या आरोग्यासाठी ब्रोकोलीचे सेवन करणेही योग्य ठरते. वाढत्या वयात देखील अॅक्टीव्ह राहील्याने या आजाराचा धोका कमी होतो.