Genome Study (Photo Credit : Pixabay)

भारतीय शास्त्रज्ञांना जीनोमिक विज्ञानाद्वारे (Genomic Science), निरोगी लोकांमधील भविष्यातील रोग अथवा आजारपण ओळखण्यात यश आले आहे. एक हजाराहून अधिक लोकांच्या जीनोमचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी दावा केला की, देशातील 90 लाखांहून अधिक लोकांना आनुवंशिक आजाराचा (Genetic Diseases) धोका आहे. याला हायपरकोलेस्टेरोलेमिया-एफएच (Hypercholesterolemia)  म्हणजेच उच्च कोलेस्ट्रॉल आजार म्हणतात. आनुवंशिक बदलांमुळे कोलेस्टेरॉल वाढते, म्हणून याला कौटुंबिक विकार असेही म्हणतात.

CSIR-Institute of Genomics and Integrative Biology (IGIB) च्या संशोधकांनी 1029 निरोगी लोकांच्या जीनोमवर अभ्यास केला आहे, जो एल्सेव्हियर या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. अभ्यासादरम्यान, संशोधकांनी 1,029 लोकांमध्ये पाच कोटींहून अधिक जीनोम प्रकार ओळखले आहेत. हायपरकोलेस्टेरोलेमिया रोगामुळे रुग्णाच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जरी हा विकार जन्मापासून अस्तित्वात असला तरीही, लक्षणे प्रौढ होईपर्यंत उशीर समोर येऊ शकतात.

IGIB मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीधर शिवसुब्बू यांनी सांगितले की, हायपरकोलेस्टेरोलेमिया हा भारतीय लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा आजार आहे आणि 146 पैकी एकाला त्याचा त्रास आहे. भारतातील 90 लाखांहून अधिक लोकांना हायपरकोलेस्टेरोलेमिया होण्याचा धोका असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. ते प्रभावीपणे रोखण्यासाठी योग्य उपचार पर्यायांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. (हेही वाचा: New Task Force in Maharashtra: कोरोना विषाणूच्या JN.1 या प्रकाराच्या रुग्णांमध्ये वाढ; महाराष्ट्र सरकारकडून नवीन टास्क फोर्सची स्थापना)

संशोधकांचे म्हणणे आहे की, जगातील प्रत्येक 250 लोकांपैकी एकाला फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमियाची समस्या असू शकते, तर भारतात 146 पैकी एक व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. मुलांमध्ये हा रोग शोधण्यासाठी, संशोधकांनी नवजात मुलांच्या निरीक्षणामध्ये फॅमिलीअल हायपरकोलेस्टेरोलेमियाची अनिवार्य तपासणी करण्याची शिफारस देखील केली आहे. जर मुलांमध्ये एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी 160 पेक्षा जास्त आणि प्रौढांमध्ये 190 पेक्षा जास्त असेल तर त्यांच्यामध्ये एफएच होण्याची शक्यता असू शकते.