धुम्रपान (Smoking) हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपण सर्वजणच जाणतो, मात्र तरीही जगामध्ये धुम्रपान करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विविध देशांच्या सरकारांनी लोकांनी धुम्रपान सोडावे म्हणून बरेच प्रयत्न केले मात्र फार कमी देशांना त्यात यश मिळाले आहे. आता इंग्लंडमधील (England) चेशायर ईस्ट (Cheshire East) शहराने एक नवीन पायलट योजना आणली आहे, ज्याद्वारे रहिवाशांना धूम्रपान सोडण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिले जात आहे. होय, ऐकायला थोडे विचित्र आहे मात्र हे खरे आहे. इंग्लंडमधील लोकांना धुम्रपान सोडल्यावर पैसे मिळणार आहेत.
या वर्षाच्या शेवटी सुरू होणार्या ‘धूम्रपान बंद प्रोत्साहन योजने’त, रहिवाशांना बारा आठवड्यांपर्यंत यशस्वीरित्या धुम्रपान सोडल्याबद्दल 20,000 रुपये मिळू शकतात. जर गर्भवती महिलेने धूम्रपान सोडले तर तिला योजनेअंतर्गत 40,000 रुपये मिळू शकतील. इंग्लंडमध्ये, धूम्रपान हे टाळता येण्याजोगे रोग आणि अकाली मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. चेशायर ईस्टर्वमध्ये, अहवालानुसार, अंदाजे 10.5% सामान्य नागरिक आणि 10.8 टक्के गर्भवती महिला तंबाखूचे सेवन करतात.
या योजनेबद्दल बोलताना, चेशायर ईस्ट कौन्सिलचे सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ मॅट टायर म्हणाले की, धूम्रपान सोडण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन/बक्षीस देणे ही योजना यशस्वी ठरल्याचे अनेक पुरावे आहेत. ही योजना धूम्रपानाचे प्रमाण कमी करण्यात आणि ते यशस्वीरित्या सोडण्यात यशस्वी ठरली आहे. Cochrane द्वारे प्रकाशित केलेल्या संशोधनात आठ देशांमध्ये 33-धूम्रपान बंद करण्याच्या प्रोत्साहन योजना चाचण्यांचे विश्लेषण केले गेले, ज्यामध्ये 21,000 हून अधिक सहभागींनी सिगारेट सोडण्याचा प्रयत्न केला. 33 चाचण्यांपैकी, 10 चाचण्यांमध्ये गर्भवती महिलांचा समावेश होता, ज्या धुम्रपान सोडण्याचा प्रयत्न करत होत्या. (हेही वाचा: इराणने व्यभिचाराबाबत सुनावली अतिशय निर्दयी शिक्षा; 51 लोकांना दगडाने ठेचून मारले- Report)
अभ्यासात असे आढळून आले की जेव्हा लोकांना आर्थिक मदत केली गेली तेव्हा ते धूम्रपान सोडण्याची शक्यता 50 टक्के जास्त होती. गर्भवती महिलांमध्येदेखील हे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त होते. दरम्यान, रिपोर्टनुसार, जी व्यक्ती दिवसातून 20 सिगारेट ओढते, ती वार्षिक 4.4 लाख रुपये वाचवू शकते. चेशायर ईस्टमध्ये या योजनेने अपेक्षित परिणाम दिल्यास, ती इतर शहरांमध्येही लागू केली जाईल.