बंगळुरूमध्ये (Bengaluru), कोरोना विषाणूच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये डॉक्टरांना एक विशेष लक्षण दिसले आहे, ज्यास ते कोविड जीभ (Covid Tongue) संबोधत आहेत. अशा परिस्थितीत रूग्णांमध्ये कोरोनाची इतर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, मात्र त्यांचे तोंड व जीभ कोरडे (Dry Tongue) पडते. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. जी.बी. सत्तूर म्हणाले की, त्यांच्याकडे हायपरटेन्शन असलेल्या 55 वर्षीय व्यक्तीने संपर्क साधला होता. या व्यक्तीचे तोंड प्रचंड कोरडे पडत होते व नंतर त्याची कोरोना चाचणी केली असता ती सकारात्मक आली. त्यामुळे जर तुम्हाला तोंडात कोरडेपणा आणि थकवा जाणवत असेल तर, कोरोना व्हायरसची तपासणी करा असे डॉक्टर सांगत आहेत.
बेंगळुरू मिरर मधील एका वृत्तानुसार, डॉक्टर सत्तूर म्हणाले, ‘मी जेव्हा या रुग्णाची ब्लड शुगर तपासली तेव्हा ती नॉर्मल आढळली. परंतु त्याचा ईएसआर थोडा जास्त असल्याचे दिसून आले. मात्र रुग्णाला ताप नव्हता परंतु फार मोठ्या प्रमाणात थकवा जाणवत होता. कदाचित ही कोरोनाची लक्षणे असावीत अशी शंका मला आली व मी त्याला आरटी-पीसीआर चाचणी करण्यास सांगितले. ही चाचणी सकारात्मक आली, यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आता डॉक्टर या कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ. सत्तूर यांनी शक्यता व्यक्त केली की, कोरोनाच्या यूके, ब्राझील किंवा भारतामध्ये सापडलेल्या डबल म्युटंट प्रमाणेच हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असावा. यासह, त्यांनी सांगितले की तोंडात कोरोनाची सुरुवात प्रामुख्याने चिडचिडेपणा, खाज सुटणे आणि तोंडाच्या कोरडेपणाने होते. यानंतर, रुग्णाला तापाशिवाय अशक्तपणा जाणवतो. (हेही वाचा: शरीरात 'ही' लक्षणे दिसली तरच रुग्णालयात जा, कोरोनाच्या रुग्णांना AIIMS प्रमुखांचा सल्ला)
डॉ.सत्तूर पुढे म्हणाले, 'डॉक्टरांनी जीभ किंवा तोंडाबाबत आलेल्या तक्रारींवर लक्ष ठेवले पाहिजे आणि त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तसेच कोरोनाचे रूप अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सरकारने जीनोम सिक्वान्सिंगवरही अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.’