Bael Fruit Health Benefits (Pc - You tube)

Bael Fruit Health Benefits: बेल हा दक्षिण आशिया व आग्नेय आशिया या उष्णकटिबंधीय भूप्रदेशांत आढळणारा एक दिव्यवृक्ष आहे. भारतीय संस्कृतीत बेल वृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बेलाच्या पानाचा वापर केला जातो. या वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून त्याला पुजेतही स्थान देऊन त्याचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला जात आहे. पानांबरोबरच बेलाच्या फळालाही मोठे महत्त्व आहे.

आयुर्वेदामध्ये बेल फळाचे आरोग्यदायी फायदे सांगण्यात आले आहेत. बेल फळाच्या रसाचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. बेल फळाचा रस प्यायल्याने आरोग्य तसेच आपलं सौदर्यं चांगलं राहण्यास मदत होते. बेलाचे फळ थंड असते. त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. बेल फळात प्रोटीन, थायमीन, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी सारखे काही पोषक तत्वे आढळतात. बेल फळाचा रस तुमच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर ठरतो. उन्हाळ्यात दररोज बेल फळाचा रस घेतल्यास मोठा फायदा होतो. आज या लेखातून आपण बेलाच्या रसाचे फायदे जाणून घेणार आहोत. (Health Benefits Peepal Leaves: पिंपळाची पानं 'या' आजारांवर ठरतील गुणकारी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे)

बेल फळाचा रस पिण्याचे फायदे -

गॅस आणि पोटदुखीच्या समस्येपासून सुटका -

धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच ऑफिसमध्ये तासनतास बसून राहिल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. तुम्हालाही गॅस आणि पोटदुखीची समस्या जाणवत असेल तर दररोज बेलाच्या फळाचा रस घ्या.

हृदयरोगाच्या समस्येपासून सुटका -

हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी बेल फळाचा रस सेवन करणं फायदेशीर ठरतं. बेलाच्या रसात एक चमचा तूप टाकून हे मिश्रित दररोज पिल्यास हृदयरोगाच्या समस्येपासून सुटका होण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत -

तुमच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रोलचे प्रमाण जास्त असल्यास ते नियंत्रित ठेवण्यास बेलाचा रस फायदेशीर ठरतो. बेल फळाच्या रसाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच यामुळे मधुमेहाची समस्याही कमी होते.

रक्त शुद्ध करण्यास मदत -

तुमचं रक्त साफ नसल्याने तुम्हाला वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. रक्त शुद्ध करण्यासाठी दररोज बेलाचा रस आणि त्यात दोन थेंब मध मिश्रित करुन घ्या. असे केल्याने तुमचं रक्त शुद्ध होईल आणि तुम्हाला त्वचेसंबधित कोणतेही आजार उद्भवणार नाहीत.

अॅसिडिटीपासून सुटका -

तुम्हाला अपचनाचा त्रास होत असल्यास बेलाचा रस फायदेशीर ठरतो. बेलाच्या रसाचे सेवन केल्याने अॅसिडिटीची समस्या दूर होते. तसेच पोटाच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)