Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) जगभरात 445,986 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 8,257,885 पेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ दिवसरात्र या विषाणूच्या उपचारामध्ये गुंतलेले असले तरी, कोरोनावर अद्यापपर्यंत कोणताही प्रतिबंधात्मक ठोस उपचार समोर आला नाही. दरम्यान, एक सकारात्मक बातमी समोर आली आहे की, इंग्लंडमधील शास्त्रज्ञांच्या पथकाने असा दावा केला आहे की, स्टिरॉइड Dexamethasone औषधाच्या वापरामुळे, गंभीर आजारी कोरोना रूग्णांना मृत्यूपासून वाचवले जाऊ शकते. त्वचेच्या समस्या आणि अॅलर्जीसाठी वापरण्यात येणारे औषध डेक्सामेथासोन कोरोना विषाणूच्या उपचारात फायदेशीर असल्याचे आढळले आहे आणि मृत्यूचा धोका कमी करण्यात ते यशस्वी झाले आहे.

मंगळवारी या औषधाबाबतच्या रिझल्टची घोषणा केली गेली आणि लवकरच हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात येईल. अभ्यासानुसार 2104 रूग्णांना डेक्सामेथासोन औषध दिले गेले व त्यांची तुलना 4321 रूग्णांशी केली गेली, ज्यांच्यावर सामान्य पद्धतीने उपचार सुरु होते. आता, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) डेक्सामेथासोनच्या क्लिनिकल चाचण्यांच्या प्राथमिक निकालांचे स्वागत केले आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक Tedros Adhanom Ghebreyesus यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘ही पहिली उपचार पद्धती आहे, ज्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा आधार घेत असलेल्या कोविड-19 रूग्णांचा मृत्यू होण्याचा धोका कमी झाला आहे.

पुढे ते म्हणतात, ‘ही चांगली बातमी आहे आणि मी यूके सरकार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अनेक यूके रुग्णालये आणि ज्यांनी या जीवनरक्षक वैज्ञानिक प्रगतीत योगदान दिले आहे अशा रुग्णांचे अभिनंदन करतो.’ ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, कोविड-19 रूग्णांचा मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी हे औषध प्रभावी सिद्ध झाले आहे. या औषधामुळे व्हेंटिलेटर वापरणार्‍या कोरोना रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 35 टक्के आणि ऑक्सिजन वापरणार्‍या रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी झाले आहे.