Deaths Due to Cardiac Arrest: तरुणांमध्ये अचानक वाढलेल्या हृदयविकाराच्या घटनांसाठी कोविड लसीकरण हा जोखीम घटक नाही- Report
Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

तरुण लोकांमध्ये अचानक वाढलेल्या हृदयविकाराच्या घटनांसाठी (Cardiac Arrest) कोविड लसीकरण (Covid Vaccination) हा जोखीम घटक नसल्याचा खुलासा झाला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) आयोजित केलेल्या केलेल्या एका अभ्यासामधून ही बाब समोर आली आहे. निरोगी तरुण प्रौढांमधील अस्पष्ट मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटकांची तपासणी करण्यासाठी हा अभ्यास केला गेला. या निष्कर्षांचे तज्ञांकडून पुनरावलोकन होणे आणि तो प्रकाशित करणे अजून बाकी आहे.

‘भारतातील 18-45 वयोगटातील प्रौढांमधील अचानक मृत्यूशी संबंधित घटक' या शीर्षकाचा हा अभ्यास आहे. या नुसार विशेषत: तरुणांमध्ये अंतर्निहित आरोग्य समस्या आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली ही हृदयविकाराची मुख्य कारणे समोर आली आहे.

आयसीएमआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या अभ्यासानुसार, कोविड लसीकरणामुळे प्रौढांमधील अचानक मृत्यूचा धोका कमी झाला आहे. आकस्मिक मृत्यूची शक्यता वाढवणाऱ्या घटकांमध्ये कौटुंबिक इतिहास, कोविडसाठी रुग्णालयात दाखल होणे, मृत्यूच्या काही काळापूर्वी मद्यपान आणि तीव्र शारीरिक हालचाली यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. या अभ्यासामध्ये 1 ऑक्टोबर 2021 आणि 31 मार्च 2023 या कालावधीत अस्पष्ट कारणांमुळे अचानक मरण पावलेल्या 18-45 वयोगटातील निरोगी व्यक्तींच्या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.

या अभ्यासासाठी मृत व्यक्तींचा वैद्यकीय इतिहास, धुम्रपान व मद्यपान, तीव्र शारीरिक हालचाली, ते साथीच्या आजारामुळे हॉस्पिटलमध्ये होते की नाही आणि त्यांना कोविडचे डोस मिळाले होते का याबाबतची माहिती गोळा केली. त्यावरून प्रामुख्याने कोविड लसीकरणामुळे हे मृत्यू झाले नसल्याचे समोर आले. या अभ्यासाच्या लेखकाचे अभ्यासपूर्ण कार्य, संशोधन किंवा कल्पना त्याच क्षेत्रातील तज्ञ असलेल्या इतरांकडून पुनरावलोकन करून ते प्रकाशित केले जाईल. (हेही वाचा: Oral Sex Worse Than Smoking: घशाच्या कर्करोगासाठी ओरल सेक्स हे धूम्रपानापेक्षाही धोकादायक; डॉक्टरांचा दावा)

दरम्यान, या आधी बातमी आली होती की, गुजरातमध्ये गरबा-दांडिया खेळताना 10 लोकांचा हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू झाला. या घटनेवर भाष्य करताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गेल्या आठवड्यात सावध केले होते की, ज्या तरुणांना यापूर्वी कोविडचा गंभीर आजार झाला आहे त्यांनी हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी कठोर शारीरिक हालचालींपासून दूर राहावे.