World Poha Day 2019: वेगवेगळ्या प्रांतातील पोह्याचे नाव आणि त्याचे आरोग्यदायी फायदे ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Poha (Photo Credits: Pexels)

ज्या पोह्यांच्या साक्षीने लगीनगाठ ठरते त्या पोह्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले ते 7 जून रोजी. आजचा हा दिवस जागतिक पोहा दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात असे एकही घर सापडणार नाही जिथे पोहे केले जात नाही. मात्र हे पोहे महाराष्ट्रात जितके लोकप्रिय आहेत तितकेच ते देशभरातही प्रसिद्ध आहेत. ते करण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी सकाळच्या नाश्तामध्ये पोह्यांना विशेष असे स्थान आहे. या पोह्यांना अनेक प्रांतात त्यांच्या भाषेत वेगवेगळी नावे आहेत ती पुढीलप्रमाणे

  • तेलुगुमध्ये-अटुकूलु
  • तामिळ आणि मल्याळमध्ये- अवल
  • बंगाल आणि आसाममध्ये-चिडा
  • भोजपुरी आणि नेपाळीमध्ये- चिउरा
  • नेवाडीमध्ये-बाजी
  • कोंकणी-फोवू
  • कन्नडमध्ये- अवालक्की
  • गुजरातीमध्ये-पौआ

ही नावं ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल. मात्र ज्या गुणकारी पोह्याची नावे इतकी अंतरंगी आहेत त्या पोह्याचे शरीराला होणारे फायदेही तितकेच चांगले. सकाळच्या नाश्त्याला पोहे खाणे खूपच फायदेशीर आणि आरोग्यदायी आहे. चला तर मग पाहूयात काय आहेत सकाळी नाश्त्याला पोहे खाण्याचे फायदे:

1. सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ल्याने तुमचे पोट भरलेले राहते. आणि काम करायला एनर्जी मिळते.

2. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी पोह्याचे सेवन फायदेशीर ठरते. पोहे खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते. यामुळे बीपीही कंट्रोलमध्ये राहतो.

3. पोहे खाल्ल्याने वजन वाढत नाही. कारण एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी २५० कॅलरीज असतात. यासोबतच यात गरजेचे व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात.

4. तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने ती दूर होते. पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. गर्भवती महिलांनी तसेच लहान मुलांनी पोहे खाल्ले पाहिजे ज्यामुळे त्यांना हिमोग्लोबिन मिळेल.

5. पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात यामुळे पोह्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. शरीराला दिवसभर कार्बोहायड्रेट्सची गरज असते. पोह्याचे सेवन केल्यास दिवसभराची कार्बोहायड्रेट्सची गरज भागली जाते.

नूडल्स, ब्रेड, केक खाऊ नका, आगोदर धोका जाणून घ्या!

पोह्याचे हे फायदे लक्षात घेता आपण रोज वा आठवड्यातून एक-दोनदा तरी पोहे खाल्ले पाहिजे. जेणेकरुन आपल्या शरीरालाही त्याचा फायदा होईल आणि सकाळच्या नाश्त्याला फास्टफूड सारख्या गोष्टींवर तुम्ही थोडे लांब रहाल.