आपल्या देशासह संपूर्ण जगात मद्यपान करून वाहन चालवणे (Drunk Driving) प्रतिबंधित आहे आणि त्यासाठी अनेक कायदे आणि शिक्षा आहेत. मात्र जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरातच दारू तयार होत असेल तर? आणि त्या अवस्थेमध्ये या व्यक्तीने गाडी चालवली तर त्याला शिक्षा होऊ शकेल? ऐकायला थोडे विचित्र आहे मात्र असे एक प्रकरण बेल्जियममध्ये (Belgium) समोर आले आहे. येथे दारू पिऊन गाडी चालवल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. या व्यक्तीची तपासणी केली असता असे आढळून आले की, त्या व्यक्तीच्या शरीरातच दारू तयार होत आहे. त्यानंतर या व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्यात आले.
ही व्यक्ती ऑटो-ब्रेव्हरी सिंड्रोम (ABS) या आजाराने ग्रस्त आहे. ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे शरीरात दारू तयार होते. ही बाब 2022 सालची आहे व या प्रकरणी आत्ता न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. माहितीनुसार, पोलिसांनी एका 40 वर्षीय व्यक्तीचे वाहन ताब्यात घेतले होते. या व्यक्ती विरोधात दारू पिऊन गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान असे आढळून आले की, त्याच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण 0.91 आहे, जे कायदेशीर मर्यादेच्या दुप्पट आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर तपासणीचे आदेश देण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांनी या व्यक्तीची तपासणी केली असता त्याला ऑटो ब्रुअरी सिंड्रोम नावाच्या आजार असल्याचे समोर आले. या विचित्र आजाराची माहिती जाणून न्यायालयापासून ते पोलिसांपर्यंत सगळेच चक्रावून गेले. यामध्ये व्यक्तीच्या शरीरात स्वतःहून दारू तयार होत राहते. म्हणूनच गाडी चालवताना या व्यक्तीने मद्यपान केल्याचा संशय पोलिसांना आला होता. (हेही वाचा: H5N1 Bird Flu Strain In Milk: गायीच्या दुधात आढळला धोकादायक बर्ड फ्लूचा विषाणू; WHO ने जारी केला अलर्ट)
सोमवारी (22 एप्रिल) प्रसारमाध्यमांना निवेदन देताना या व्यक्तीचे वकील ॲन्से गेस्क्वेअर यांनी सांगितले की, 3 डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनी त्याला एबीएसचा त्रास असल्याचे पुरावे दिले होते, त्यामुळे न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. या सिंड्रोमचे पहिले प्रकरण 2014 मध्ये समोर आले होते. ऑटो ब्रुअरी सिंड्रोममध्ये तुमचे शरीर शर्करायुक्त आणि पिष्टमय पदार्थांचे अल्कोहोलमध्ये रूपांतर करते. त्यामुळे तुम्ही मद्यपान केले नसले तरीही, तुम्ही नशेत असल्यासारखी लक्षणे दिसू शकतात.