भारतात केवळ वायू प्रदुषणामुळे तब्बल १ लाख बालकांचा मृत्यू; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल
भारतातील वायू प्रदुषण; एक संपादित आणि प्रातिनिधीक प्रतिमा

संपूर्ण देशाला केवळ अस्वस्थच नव्हे तर, भविष्यातील अनेक पिढ्यांच्या भवितव्याबाबतच काळजी वाटावी असा एक धक्कादायक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केला आहे. या अहवालानुसार भारतात वायू प्रदुषणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. इतकेच नव्हे तर, सन २०१६मध्ये तब्बल १,१०,००० बालकांचा मृत्यू केवळ वयू प्रदुषणामुळे झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. वायू प्रदुषणामुळे होणाऱ्या पाच वर्षांखाली मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात भारताने जगातील इतर देशांना मागे टाकले आहे. हेसुद्धा तितकेच धक्कादायक वास्तव या अहवालामुळे पुढे आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने हा अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला. अहवालात म्हटले आहे की, भारतासह जगभरातील मध्यवर्गीय आयुष्य जगत असलेल्या अनेक देशांमध्ये पाच वर्षांहून कमी वयाच्या बालकांचे मृत्यूचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. ही आकडेवारी सन २०१६ या वर्षातील आहे. हवेमध्ये असलेल्या अतिसुक्ष्म कणांमुळे (पीएम) निर्माण झालेले वायुप्रदुषणामळेच ही बालके मृत्यूची शिकार बनत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात पुढे म्हटले आहे की, पाच वर्षांहून कमी वयाची ६०,९८७ बालके पीएम २.५मुळे मृत्यूमुखी पडली आहेत. यात भारत क्रमांक एक तर, नायजेरिया क्रमांक २वर आहे. भारताचा शेजारी पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. नायजेरिया, पाकिस्तान या देशातील वायुप्रदुषणामुळे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या अनुक्रमे ४७,६७४ तर, २१,३३६ हजार इतकी आहे.

दरम्यान, वायुप्रदुषणामुळे मृत्यू पावणाऱ्या बालकांचे प्रमाण हे प्रति १ लाख बालकांमागे ५०.८ टक्के असे आहे. यात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. सन २०१६मध्ये ३२,८८९ मुलींचा मृत्यू झाला. सर्व वयोगटातील मुलींचे प्रमाण विचारात घेता २०१६मध्ये तब्बल एक लाख बालके वायुप्रदुषणामुळे दगावली. अहवालानुसार, स्वयंपाक करताना घरात स्वयंपाक घरात होणारे प्रदुषण, तसेच घराबाहेरचे वायुप्रदुषण यामुळे भारतासह जगभरातील अनेक मध्यमवर्गीय आयुष्य जगणाऱ्या नागरिकांच्या देशातही हे प्रमाण भयावह आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, भारतात सुमारे २० लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदुषणामुळे झाला आहे. हे प्रमाण जगाच्या तुलनेत २५ टक्के इतके आहे. (हेही वाचा, केंद्र सरकारने तयार केले पर्यावरणपूरक फटाके; पारंपरिक फटाक्यांपेक्षा स्वस्त, प्रदूषणाला बसेल आळा)

दरम्यान, प्रसारमध्यमात वर्तमानकाळात दिल्लीबाबत छापून येत असलेल्या बातम्यांवर नजर टाकली तरी, प्रदुषणाची तीव्रता आणि व्याप्ति आपल्या ध्यानात येऊ शकते.