200 Crore Vaccination: लसीकरणात भारताचा विक्रम! केवळ 548 दिवसात 200 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण
COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

जगाच्या कानाकोपऱ्यात अजुनही कोरोनाचा (Corona) संसर्ग सुरुच आहे. भारतात देखील अजुनही विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळतात. पण कोरोनावर सर्वाधिक जलद गतीने ताबा मिळवणाऱ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांपैकी भारत (India) पहिला देश आहे. कोरोनावर (Covid) उपाय म्हणून भारतात लसीकरणाची (Vaccination) मोहिम राबवण्यात आली. देशातील नागरिकांनी देखील या लसीकरणाच्या मोहिमेला भरभरुन प्रतिसाद दिला. 548 दिवसांपूर्वी कोव्हिड लसीकरणाच्या (Covid Vaccination) मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती तर आज भारताने 200 कोटीहून अधिक लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. केवळ 548 दिवसांत 200 कोटींचा आकडा गाठत भारताने विक्रम रचला आहे.

 

संबंधित माहिती देशाचे आरोग्य मंत्री (Health Minister) मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे. तसेच त्यांनी भारतीयांचे अभिनंदन केले. भारताच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) देखील 200 कोटी लसीकरणाचा विशेष आकडा पार केल्याबद्दल भारतीयांचे अभिनंदन केले तसेच लसीकरण मोहिमेत हातभार लावलेल्या सर्वस्तरातील नागरिकांचे त्यांनी कौतुक केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील 200 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठल्या बद्दल भारतीय नागरिकांचे कौतुक केले.

 

भारतात लसीकरणासाठी प्रमुख्याने कोव्हॅक्सिन (Covaxin), कोव्हिशील्ड (Covishield) आणि रशियन व्हिक्सिन स्पुतनिक (Sputnik) या लसी वापरण्यात आल्या. तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोरबेव्हॅक्सचा (Corbevax) वापर करण्यात आला. लसीकरणाचा 200 कोटींचा टप्पा गाठणं हे भारतासाठी एक अभिमानाची बाब आहे तरी अजुनही लसीकरणापासून वंचित असलेल्यांनी  लवकरात लस घ्यावी असं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.  ज्यांना बुस्ट डोस घ्यायचा असेल त्यांनी तो घेण्यास त्वरा करावा कारण स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवा (Azadi Ka Amrit Mohotsav) निमित्त केंद्र सरकार तर्फे पुढील 75 दिवस 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर (Booster Dose) डोस देण्यात येणार आहे.