Video|Longest Dosa: बेंगळूरूमध्ये 75 शेफनी तयार केला 123 फुट लांबीचा जगातील सर्वात मोठा डोसा; Guinness World Records मध्ये नोंद
Video|Longest Dosa (Photo Credit : Twitter)

एमटीआर फूड्सने (MTR Foods) तब्बल 123 फूट लांबीचा डोसा (Longest Dosa) बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) केला आहे. हा डोसा बनवण्यासाठी त्यांनी 75 किलो पिठाचा वापर केला. एमटीआर फूड्सने हा विक्रम त्यांच्या बेंगळुरू येथील बोम्मासांद्र कारखान्यात केला. हा डोसा बनवण्याच्या टीममध्ये 75 जणांचा समावेश होता. हा 123 फूट लांबीचा डोसा एमटीआरने त्यांची 100 वर्षे साजरी करण्यासाठी बनवला होता. एमटीआरने लॉरमन किचन इक्विपमेंट्स (Lorman Kitchen Equipments) च्या सहकार्याने शनिवारी हा 123 फूट लांबीचा डोसा बनवून सर्वात लांब डोसा बनवण्याचा विश्वविक्रम केला. यापूर्वीचा विक्रम सुमारे 54 फूट होता, जो 2014 मध्ये स्थापित करण्यात आला होता.

हा डोसा बनवण्याची प्रक्रिया सामान्य डोसापेक्षा थोडी वेगळी होती. सुरुवातीला 123-फूट लांब पॅन एका विशिष्ट तापमानावर सेट केला गेला होता. या तव्याचे सतत इन्फ्रारेड थर्मामीटरने निरीक्षण केले जात होते. तवा गरम झाल्यावर 'बॅटर हॉपर' चा वापर करून डोसा पीठ त्याच्यावर पसरवले गेले. यामुळे संपूर्ण तव्यावर एकसारखे पीठ पसरले गेले. सर्व काही सुरळीत पार पडल्यानंतर, शेवटी कनेक्टेड स्लाइसर्सच्या मदतीने तो रोल केला गेला आणि कुरकुरीत डोसा कोणत्याही ब्रेकशिवाय तयार झाला.

एमटीआरचे सीइओ सुनय भसीन म्हणाले, 'डोसा हा अगदी सुरुवातीपासूनच एमटीआरच्या वारशाचा एक भाग आहे आणि आजही एमटीआरच्या सर्वात आवडत्या उत्पादनांपैकी एक आहे. 123 फुट डोसा हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. आम्ही 100 फूट डोसासाठी प्रयत्न करत होतो, मात्र आम्ही स्वतःला मागे टाकून 123 फूट डोसा तयार केला आहे.' (हेही वाचा: Viral Video: बाजाराता आली कॉफी मॅगी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप)

लॉरमन किचन इक्विपमेंट्सचे एमडी चंद्र मौली म्हणाले, 'जगातील सर्वात लांब डोसा खास तयार केलेल्या इंडक्शन स्टोव्हवर शिजवला गेला. हा लॉर्मनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डोसा आहे. इंडक्शन कुकिंग उपकरणे अत्यंत कार्यक्षम, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक आहेत व ती शेफसाठी एक सुरक्षित परिसंस्था निर्माण करतात. या उल्लेखनीय कार्यक्रमात एमटीआरसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे.' अनुभवी शेफ व्यतिरिक्त, रमाय्या विद्यापीठातील नवोदित पाककला प्रतिभांनीही या डोसा निर्मितीमध्ये योगदान दिले.