First Margashirsha Guruvar 2024 Vrat Date: यंदा मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर पासून सुरु झाला आहे. या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत. मार्गशीर्ष महिन्यात शंकर भगवान, महालक्ष्मी आणि श्रीविष्णूची पूजा केली जाते. या महिन्यात शुभ कार्ये विशेषतः फलदायी ठरतात. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. या महिन्यात भजन आणि कीर्तन केल्याचे फळ अतुलनीय आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारची तारीख -
मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी पूजेच्या ठिकाणी कलश बसवून, केळीची पाने, आवळा आणि आंब्याच्या पानांनी बनवलेली तोरण सजवून लक्ष्मीची मूर्ती बसवतात. यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवाराचे व्रत 5 डिसेंबर 2024 ला म्हणजेचं उद्या ठेवण्यात येणार आहे. (हेही वाचा -Margshirsh Vinayaka Chaturthi 2024: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी कधी साजरी केली जाणार? जाणून घ्या तारीख , महत्व आणि पूजा पद्धत)
मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारच्या तारखा -
- पहिला मार्गशीर्ष गुरुवार – 5 डिसेंबर 2024
- दुसरा मार्गशीर्ष गुरुवार – 12 डिसेंबर 2024
- तिसरा मार्गशीर्ष गुरुवार - 19 डिसेंबर 2024
- चौथा मार्गशीर्ष गुरुवार - 26 डिसेंबर 2024
मार्गशीर्ष गुरुवार पूजाविधी -
- मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीची मुर्ती ज्याठिकाणी स्थापित करायची आहे, ती जागा स्वच्छ करा.
- पाटाभोवती रांगोळी काढा. चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घाला.
- कलशावर विड्याची पाने अथवा आंब्याची पाण ठेवून त्यावर नारळ ठेवावा. यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कपडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा, आता चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मीची मुर्ती ठेवा.
- कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा.
- यानंतर विधीवत पूजा करा.
- त्यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा.
महाराष्ट्रात अत्यंत भक्तीभावाने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत पाळले जाते. या दिवशी महिला किंवा मुली लक्ष्मीमातेची पूजा करतात. तसेच लक्ष्मी मातेची कथा वाचतात आणि दिवसभर उपवास करून हे व्रत करतात. शेवटी लक्ष्मी मातेला नैवैद्या दाखवल्यानंतर या व्रताची सांगता करण्याची प्रथा आहे.