हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा (Vat Purnima 2021). ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. यावर्षी 24 जून रोजी वट पोर्णिमा साजरी केली जाणार आहे. परंतु, वटपौर्णिमा साजरी करण्यामागचे नेमके कारण काय आहे? तसेच यावर्षी या सणाचा मुहूर्त काय आहे? याविषयी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
एका पारंपारिक कथेनुसार अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. हे देखील वाचा- Rajmata Jijau Punyatithi 2021 Messages: राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्त मराठी HD Images, Greetings, Status शेअर करुन करा जिजाऊंना प्रणाम!
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत ठेवतात.
वटपौर्णिमा 2021 ची तिथी आणि मुहूर्त-
वटपौर्णिमा दिवस: 24 जून 2020
वटपौर्णिमा मुहूर्त: 24 जून पहाटे 03:32 पासून तर, 25 जून मध्यरात्री 12: 09 पर्यंत
पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे. प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसल्यास वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी. एका चौरंगावर तिची स्थापना करावी. व्रताचरणाचा संकल्प करावा. त्यानंतर देवतांचे आवाहन करावे. तुप, दूध, मध, दही आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण करावे. त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. हळद-कुंकू, फुले, फळे अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा.