2019 चे शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse 2019) 26 डिसेंबर गुरुवारी आहे. सरत्या वर्षात होणारे हे सूर्यग्रहण पूर्ण नाही, तर हे सूर्यग्रहण खंडग्रास असेल, जे वलयाकार असेल. हे वलयाकार आकाराचे सूर्यग्रहण देशाच्या दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये दिसून येईल. उर्वरित देशात सूर्यग्रहण अर्धवट दिसतील.
भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी 8.17 वाजेपासून सुरू होईल आणि सकाळी 10.57 पर्यंत प्रभावी राहील. म्हणजेच ग्रहण कालावधी साधारण 3.30 तास असेल. या खगोलशास्त्रीय घटनेचा प्रभाव नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, चीन, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांवरही होईल.
दुर्मिळ योग -
काशी हिंदू विद्यापीठाचे डॉ गणेश प्रसाद मिश्रा यांचे म्हणणे आहे की, असे दुर्मिळ सूर्यग्रहण 296 वर्षांपूर्वी 7 जानेवारी 1723 रोजी झाले होते. त्यानंतर, आता 26 डिसेंबर 2019 रोजी ग्रह नक्षत्रांची स्थिती समान असेल.
कोणत्या ठिकाणी दिसेल हे सूर्यग्रहण -
हे सूर्यग्रहण भारत, श्रीलंका, सौदी अरेबिया, सुमात्रा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि बोर्निओमध्ये दिसेल. ऊटी, कोयंबटूर, शिवगंगा, तिरुचिराप्पल्ली, अल-होफूफ आणि सिंगापूरमधील काही प्रसिद्ध शहरांमध्ये हे वलयकारी सूर्यग्रहण दिसेल. तसेच मुंबई, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई, मैसूर, कन्याकुमारी, रियाध, दोहा, अबू धाबी, मस्कट, कुवैत शहर, कराची, क्वालालंपूर, जकार्ता आणि भारतातील काही प्रसिद्ध शहरांमध्येही हे दिसेल.
नैसर्गिक आपत्तींची चिन्हे -
25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.32 वाजता सूर्यग्रहणा सुतकास प्रारंभ होईल, जे ग्रहणाचा समाप्तीपर्यंत चालेल. ज्योतिषांच्या मते, ग्रहण सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर पौष महिन्यात मंगळ राशी बदलून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. वृश्चिक जलतत्व राशि आहे, म्हणूनच या ग्रहण कालावधी दरम्यान, मोठी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. भूकंप किंवा जोरदार बर्फवृष्टी होऊ शकते, तसेच त्सुनामीचाही धोका आहे. अशा परिस्थितीत समुद्राच्या किनाऱ्यावर आणि पर्वतावर राहणाऱ्या लोकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. (हेही वाचा: 2020 Holiday Calendar: जाणून घ्या कधी आहेत सुट्ट्या आणि कसे करू शकता तुम्ही नवीन वर्षातील फिरण्याचे प्लॅन्स)
ग्रहणाच्या काळात काळजी -
ग्रहणाच्या वेळी कोणीही पूजा-पाठ, पूजा-अर्चना करू नये. आपल्या घरात जे काही खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत त्या सर्वांवर तुळशीची पाने ठेवावी. ग्रहण संपताच संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यावे. याकाळात घरात काहीही शिजवू नये किंवा काही खाऊ नये. ग्रहणाच्या कालावधीमध्य गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
राशींवर परिणाम -
या ग्रहणाच्या परिणामापासून कन्या, तूळ आणि कुंभ राशीला फायदा होईल. या राशीच्या लोकांच्या वैयक्तिक जीवनात, तसेच व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. याशिवाय पदोन्नती होण्याची शक्यता आहे. हे ग्रहण कर्क, वृश्चिक, धनु आणि मीनसाठी त्रासदायक असेल. आरोग्य, आर्थिक नुकसान आणि तणाव यासारख्या संकटांची शक्यता आहे.
अशाप्रकारे या संपूर्ण सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ तसेच विज्ञानाशी संबंधित संशोधकांमध्ये उत्सुकता आहे.