
Shri Gondavalekar Maharaj Punyatithi 2019: यंदा गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाचे 106 वे वर्ष आहे. या उत्सवामध्ये देशा-परदेशातून भक्त मोठ्या संख्येने श्री क्षेत्र गोंदवलेमध्ये दाखल होतात. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून दशमी पर्यंत हा सोहळा रंगतो. यंदा हा उत्सव 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. यामध्ये कोठीपूजन, माळ व भजन पहारा , ब्रह्मानंदमंडप कार्यक्रम, लघुरुद्राभिषेक, श्रींचे पुण्यस्मरण असे विविध कार्यक्रम पार पडतात. रोज सकाळी 8 ते 9 सामुहिक नामस्मरण होते. व श्रींची पालखी 10 वाजता निघेल. गुलालाचा कार्यक्रम 21 डिसेंबर 2019 रोजी पहाटे 5.55 वाजता संपन्न होणार आहे. मुख्य कार्यक्रमाच्या वेळेस श्रींचे पुण्यस्मरण-गुलाल आणि आरती करून फुलांची उधळण केली जाते. या या मुख्य कार्यक्रमाचे आकर्षण भक्तांमध्ये असते.
उत्सव कालावधीत मंदिर परिसरात होणार्या सर्व कार्यक्रमाचा भाविकांना पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी कायमस्वरूपी प्रशस्त मांडव घालण्यात आला आहे. तसेच संपूर्ण परिसर विद्युत माळांनी सुशोभित केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बहुरंगी माळांमधून “श्रीराम जयराम जयजयराम” ही अक्षरे सरकत्या स्वरुपात दिसतात. रात्रीच्या वेळी हे विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडतात.
मागील शंभर वर्षांपासून हीच परंपरा असून नियमित भक्त त्याची आराधना करतात. या उत्सवाप्रमाणेच गोंदवल्याला गुढीपाडवा, रामनवमी, गोपाळकाला, गुरूपौर्णिमा यासारखे उत्सव मोठ्या उत्सहात साजरे करतात. भगवंतांच्या नामात रंगण्याची कला साधावी म्हणून गोंदवले येथे विविध उत्सव साजरे केले जातात.