Shravan Somvar 2024: हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि सृष्टीचा सर्व कारभार भगवान शंकराकडे सोपवतात. या चार महिन्याच्या कालावधीत भगवान शंकराच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात श्रावण सोमवार हा सण खूप महत्वाचा सण मानला जातो. विशेषतः श्रावण महिण्यात महादेवाची उपासना केल्यास महादेवाची विशेष कृपा मिळते. हिंदू लोकांसाठी श्रावण महिना हा पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात सण, व्रत समारंभांची रेलचेल असल्याने सारेच उत्साहाचे, जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण असते.
नागपंचमी (Nagpanchami) या पहिल्या सणाने श्रावण महिन्यात सणांची सुरूवात होते, तर बैलपोळा (Bailpola) हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना करतात. या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा श्रावण महिना किती तारखेपासून सुरू होणार व भगवान शिवाला समर्पित पवित्र महिन्याशी संबंधित महत्त्व, परंपरा आणि विधी जाणून घेऊया. हेही वाचा: Shravan Somwar 2023 Wishes: श्रावण सोमवार निमित्त SMS, Wishes, Images, Whatsapp आणि Facebook Status च्या माध्यमातून शेअर करुन शिवभक्तांना द्या खास शुभेच्छा!
श्रावण सोमवारचे महत्व-
भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे असा समज आपल्याकडे आहे आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते. महादेवाची इत्यंभूत पूजाअर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असेही म्हटले जाते. याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे, देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्ये केली आणि उपवास-साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते. त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता. त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे.
दुसऱ्या मान्यतेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान भोलेनाथांनी समुद्रातून बाहेर आलेले हलाहल विष प्रश्न केले, त्यामुळे सर्व देवतांनी मिळून त्यांच्या घशातील जळजळ शांत करण्यासाठी भगवान शंकराचा जलाभिषेक केला. त्यामुळे त्यांना या हलाहल विषाच्या प्रभावातून शांती मिळाली आणि ते आनंदी झाले. तेव्हापासून भगवान शंकराला जलाभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे.
श्रावण मास 2024 प्रारंभ तारीख-
हिंदू पंचागानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावणमासारंभ होतो. यंदा 5 श्रावणी सोमवार येणार आहे. पंचांगानुसार श्रावण महिना यंदा 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावणमासारंभ होईल, तर 3 सप्टेंबर 2024 ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल. यंदाच्या श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे कारण श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरु होत आहे. त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी असेल. पहिला श्रावण सोमवार 5 ऑगस्टल असेल, दुसरा श्रावण सोमवार 12 ऑगस्टला, तिसरा श्रावण सोमवार 19 ऑगस्ट, चौथा श्रावण सोमवार 26 ऑगस्टला आणि पाचवा आणि शेवटचा श्रावण सोमवार 2 सप्टेंबरला असेल.
श्रावण महिन्यातील परंपरा आणि विधी-
धर्मशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार श्रावणातील सोमवारी शिवशंभूचे पूजन करताना चंदन, अक्षता, बेल, धोत्र्याचे पुष्प, दूध आणि जल अर्पण केले जाते. तसेच, 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो. त्यातून शांतता लाभते. शिवाय, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण घराघरांमधून होते.
पूजा विधी-
श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे.गंगा जल किंवा एखाद्या पवित्र नदीचे पाणी घरात शिंपडावे. त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. श्रावण सोमवारी उपवास करावा. देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी. नंतर एका ताम्हणात शंकराची पिंड ठेवावी. शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा. महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावं. महादेवासमोर दिवा लावावा. पूजा करताना “ॐ महाशिवाय सोमाय नम:” किंवा “ॐ नम: शिवाय” या मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी. धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरुन वाहावी व आरती करून पूजा विधी संपन्न करावी. दिवसभर उपवास केल्या नंतर तुम्ही संध्याकाळी परत एकदा देवाची पूजा करून नेवेधय दाखवून उपवास सोडू शकता.