
हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन (Holi 2025) केले जाते. यंदा 13 मार्च रोजी होलिका दहन केले जाणार आहे. पौर्णिमा तिथीची सुरुवात 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10.35 वाजता होईल आणि समाप्ती 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12.23 वाजता होईल. हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्रात होळी हा सण विविध पद्धतींनी आणि परंपरांनी साजरा केला जातो. कोकणातील शिमगा उत्सव (Shimga) हा होळीचा एक विशेष प्रकार आहे, ज्यामध्ये पारंपरिक नृत्य, गाणी, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. हा शिमगात्सोव जवळजवळ 7 दिवस चालतो.
ग्रामदेवतेच्या पालख्या, होळी पूजन, संकासुर वध, लोककला आणि पारंपरिक जल्लोष यामुळे शिमगा हा कोकणातील सर्वात मोठा आणि उत्साहवर्धक सण मानला जातो. कोकणातील शिमगोत्सव हा गावाच्या संस्कृतीशी, शेतीशी आणि ग्रामदैवताशी निगडीत असलेला सण आहे. कोकण प्रदेशात, शिमगा हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही; तो एक सामुदायिक कार्यक्रम आहे, जो सामाजिक सौहार्द आणि एकता वाढवतो.
हा लोकांसाठी एकत्र येण्याचा, भूतकाळातील तक्रारी विसरून आनंद आणि उत्साहाने जीवन साजरे करण्याचा काळ आहे. कोकणातील कृषीप्रधान समुदायांसाठी, शिमगा हा निसर्गाचा सन्मान करण्याचा आणि भविष्यातील समृद्धीसाठी आशीर्वाद मिळविण्याचा एक मार्ग आहे. तर अशा या शिमग्यानिमित्त खास Wishes, Messages, Wallpapers, WhatsApp Status पाठवून द्या शुभेच्छा!





दरम्यान, शिमगा या उत्सवाची सुरुवात होलिका दहन विधीपासून होते. हा एक सामुदायिक कार्यक्रम आहे, जिथे लोक नारळ आणि धान्य यासारख्या अन्नपदार्थांना आगीत अर्पण करण्यासाठी एकत्र येतात. यावेळी पेटवलेल्या होळीची पूजा करून, पारंपारिक गाणी गाऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. या उत्सवादरम्यान शिमगा गीते म्हणून ओळखली जाणारी पारंपारिक गाणी गायली जातात, त्यासोबत लोकनृत्येही सादर केली जातात. त्यानंतर पाच दिवसांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली जाते.
कोकणातील शिमग्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे पालखी उत्सव. शिमग्यामध्ये स्थानिक मंदिरांमधील देवतांची सुंदर सजवलेल्या पालख्यांमधून, ढोल ताशा, लोकसंगीत आणि नृत्यासह मिरवणूक काढली जाते. या काळात अनेक ठिकाणी तमाशा, दशावतार आणि पोवाडा यांसारखी लोकनाट्ये सादर केली जातात. शिमग्यावेळी घरात, गावात विशेष पारंपारिक पदार्थांच्या मेजवान्या आयोजित केल्या जातात. शिमगा हा कुटुंबे आणि मित्रांसाठी एकत्र येण्याचा काळ आहे. ग्रामीण भागात, लोक एकमेकांच्या घरी भेट देतात, मिठाईची देवाणघेवाण करतात. एकत्र येऊन खेळ, गायन, नृत्ये यांच्या मदतीने नातेसंबंध दृढ केले जातात. अशाप्रकारे कोकणातील शिमग्याला मोठे प्रचंड सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे.