Sardar Vallabhbhai Patel Death Anniversary: लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे 'संघर्षमय' व्यक्तिगत जीवन आणि राजकीय प्रवास
SardarVallabhbhaiPatel (PC-Twitter)

Sardar Vallabhbhai Patel Death Anniversary: स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 झाला. सरदार पटेल यांच्या अंगी लहानपणापासूनच संघटन कौशल्य, साहस आणि राष्ट्रभक्ती होती. त्यांचे वडील जवेरभाई हे राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर स्वातंत्र्याची पहिली लढाई लढले होते. पटेल 1910 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांनी 1913 मध्ये वकिलीस सुरूवात केली. महात्मा गांधी यांच्यामुळे ते स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. तसेच पटेल यांनी खेडा सत्याग्रहात गांधीजींचे जवळचे सहकारी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आणि त्यांनी वकिलीच्या व्यवसायाला पूर्णविराम दिला.

पटेल यांच्याकडे 1923 सालच्या नागपूर झेंडा सत्याग्रहाचे नेतृत्व होते. त्यांनी तो सत्याग्रह यशस्वी केला. याच सालच्या बोरसद सत्याग्रहातही ते यशस्वी झाले. 1927 साली ते नगरपारिकेचे अध्यक्ष असताना गुजरातमध्ये जलप्रलय झाला. यात त्यांनी पूरग्रस्तांना मोठी मदत केली. 1928 च्या फेब्रुवरीत बार्डोलीला करबंदीची चळवळ जोरात सुरू झाली. या लढ्याची संपूर्ण योजना वल्लभभाईंनी आखली होती. फेब्रुवारी 1928 ते ऑक्टोबर 1928 पर्यंत हा लढा चालू होता. त्यात त्यांनी यश मिळविले. बार्डोली तालुक्यातील कर आंदोलनामुळे त्यांना 'सरदार' ही उपाधी मिळाली. पटेल यांनी कराचीमधील काँग्रेस अधिवेशनात 'गांधी-आयर्विन' करार मांडला. पटेल यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. पटेल 1932 ते 1933 दरम्यान, येरवडा तुरूंगात राहिले.

हेही वाचा - Gopinath Munde Jayanti 2019: 'संघर्षयात्री' गोपीनाथ मुंडे व्यक्तिगत जीवन आणि राजकीय प्रवास)

सरदार पटेल यांना 1936 साली पुन्हा प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणूक मंडळाचे अध्यक्ष केले गेले. 1940 च्या नोव्हेंबरमध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना स्थानबद्द करण्यात आले. 'भारत छोडो' आंदोलनात पटेल यांची महत्त्वाची भूमिका होती. 9 ऑगस्टला पटेल यांना अहमदनगरच्या किल्ल्यात इतर काँग्रेसच्या नेत्यांबरोबर अटकेत ठेवले. त्यानंतर 15 जून 1945 रोजी त्यांची सुटका झाली.

सरदार पटेल यांची 2 सप्टेंबर 1946 रोजी हंगामी मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून निवड करण्यात आली. तसेच पटेल हे घटनापरिषदेचे सभासद होते. सरदार पटेल यांचे सर्वाच महत्त्वाचे काम म्हणजे संस्थानांचे विलिनीकरण होय. पटेल यांनी संस्थानांचे विलिनीकरण करुन राष्ट्रीय ऐक्य निर्माण केले. त्यांनी हैदराबाद, जुनागड व काश्मीर सोडून इतर 550 संस्थाने भारतात विलीन केली. तसेच काही दिवसांनी त्यांनी हैदराबाद संस्थानही भारतात विलीन केले.

महात्मा गांधीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पटेल यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. सरदार पटेल यांना नागपूर, प्रयाग, उस्मानिया यांसारख्या अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली. 1950 मध्ये सरदारांची प्रकृती अधिक खालावली. हवाबदलासाठी सरदार पटेल मुंबईत आले. त्यानंतर काही दिवसांत म्हणजेच 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

सरदार पटेल यांचा काँग्रेसच्या पक्ष संघटनात्मक कार्यात महत्त्वाचा वाटा आहे. पटेल यांना भारताचा 'पोलादी पुरुष' म्हणून सर्व जगभर ओळखले जाते. पटेल हे धार्मिक व परंपरागत विचारसरणीचे होते. सरदार पटेल हे पूर्णतः वास्तववादी होते. त्यांना आदर्शवाद मान्य नव्हता. त्यांचे जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत मतभेत होते. मात्र, महात्मा गांधी यांच्यामुळे ते एकत्र काम करत असतं. सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य लक्षात घेऊन 'द लंडन टाइम्स'ने त्यांचा 'बिस्मार्कपेक्षा श्रेष्ठ राजकारणपटू', असा गौरव केला होता. तसेच भारत सरकारने सरदार पटेल यांचे कार्य लक्षात घेऊन गुजरातमध्ये नर्मदेच्या पात्रात 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातला सर्वांत मोठा पुतळा उभारला आहे. सरदार वल्ल्भभाई पटेल यांच्या 182 मीटर उंचीच्या या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबरला करण्यात आलं होतं.