Tukaram Beej 2021: तुकाराम बीज निमित्त आज आळंदी मध्ये अवतरली देहूनगरी; पहा फोटोज
Tukaram Beej 2021 | Photo Credits: Instagram

महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा वारसा आहे. यामध्ये जगतगुरू अशी ओळख असलेल्या संत तुकाराम (Sant Tukaram Maharaj)  महाराजांच्या भक्तांसाठी, वारकर्‍यांसाठी आजचा दिवस खास आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले अशी धारणा असल्याने दरवर्षी वारकरी या तिथीला तुकाराम बीज (Tukaram Beej)  साजरा करतात. यंदा कोविड 19 च्या संकटामुळे देहू नगरीत 'तुकाराम बीज' सोहळा मर्यादीत लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे त्यामुळे आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या (Sant Dyaneshwar) आळंदीतच (Aalandi) वारकर्‍यांसाठी खास देहू (Dehu) नगरी साकरण्यात आली आहे.

आज तुकाराम बीज निमित्त रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. आळंदी मध्ये फुला-पानांच्या मदतीने आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आळंदी देवस्थानाने शासकीय नियमांच्या अधीन राहून तुकाराम बीज सोहळा पार पाडणार असल्याचं सांगितलं आहे. Tukaram Beej 2021: अजित पवार, अनिल देशमुख ते मुक्ता टिळक सह या मान्यवरांनी तुकाराम बीज निमित्त जगतगुरू तुकोबा रायांना केले अभिवादन.

पहा आळंदी मधील देहू नगरीचे फोटोज

यंदा संत तुकारामांचा 373 वा सदेह वैकुंठगमन सोहळा आहे. मात्र देहूत आज तो केवळ 50 जणांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल. या कार्यक्रमाला वारकर्‍यांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. देहू नगरपंचायतीने 2 दिवसांसाठी संचारबंदी लागू केलेली आहे. आज पूजा, पालखी आणि कीर्तनांच्या कार्यक्रमांनी देहू नगरी दुमदुणार आहे. आज तुकोबा रायांच्या मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरा संत तुकारामांनी उत्तर भारतापर्यंत पोहचवली. 17 व्या  शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकोबा रायांची ओळख आहे. त्यांनी आपल्या काव्यामधून, अभंगांमधून समाजातील दांभिकतेवर हल्लाबोल करत समाज परिवर्तन केले होते.