Pandharpur Mandir | Photo Credits: Twitter

आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. नवरात्रोत्सवाला आजपासून आरंभ होत आहे. त्यामुळे देशभरातील वातावरण अगदी भक्तीमय झाले आहे. कोविड-19 चे सावट असले तरी घटस्थापना, नवरात्रोत्सवाचा आनंद काही कमी झालेला नाही. नवरात्रोत्सवानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात लक्षावधी तुळशीच्या पानाची आरास करण्यात आली आहे. महत्त्वाच्या सणांना पंढरपूरचे विठ्ठ्ल मंदिर वैविध्यपूर्ण पद्धतीने सजवले जाते. कोरोना संकटामुळे मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आलेली नसली तरी मंदिर समितीकडून मंदिर सजवण्याची परंपरा अखंड ठेवण्यात आली आहे. (Navratri Colours 2020 Full Schedule: शारदीय नवरात्री नऊरंगांचं मराठी वेळापत्रक तारखेनुसार इथे पहा आणि मोफत डाऊनलोड करा PDF स्वरूपात!)

आज विठ्ठल हिरव्या रंगाचे धोतर आणि केशरी रंगाचे उपरण्यात सजला आहे. तर गुलाबी रंगाच्या साडीत रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलले आहे. तुळशीच्या लक्षावधी पानांची आरास मंदिरात दिसत आहे. त्याचबरोबर गुलाबाच्या लाल फुलांनी ठिकठिकाणी जगन्माता, कृष्णाई, विठाई, कान्हाई, किठाई असे लिहिण्यात आले आहे. मंदिरातील ही आरास मन प्रसन्न करते हे नक्की.

पहा फोटोज आणि व्हिडिओ:

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देशभरातील विविध देवीमातेच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी धाव घेतली आहे. मात्र अद्याप महाराष्ट्रात मंदिरं खुली न झाल्याने मुंबईकरांनी बाहेरुनच मुंबाईदेवीचे दर्शन घेतले. तर काही मंदिरांमध्ये ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, नवरात्र उत्सवाचा आनंद असला तरी कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.