
प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळा (Mahakumbh Mela 2025) महाशिवरात्रीच्या दिवशी संपला. प्रयागराज शहरातील त्रिवेणी संगमच्या काठावर आयोजित महाकुंभमेळ्यात 66 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर तो सनातन धर्माच्या महान सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाची कल्पना देखील देतो. दर 12 वर्षांनी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळा भरतो. प्रयागराजनंतर आता पुढचा कुंभमेळा कुठे आणि केव्हा होणार आहे याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्योतिषी राकेश चतुर्वेदी यांच्या मते, प्रयागराजनंतर पुढील कुंभमेळा 2027 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) येथे होणार आहे.
महाराष्ट्र सरकारने सुरु केली तयारी-
सन 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने तयारी सुरु केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा, कुंभमेळ्याची कामे गतीने व्हावीत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करावे. यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा. कुंभमेळ्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.
नाशिक कुंभमेळा तारखा-
नाशिकमधील गोदावरीच्या काठावर होणारा हा कुंभमेळा शनिवार, 17 जुलै 2027 रोजी सुरू होईल. नाशिक कुंभमेळ्याची सांगता मंगळवार, 17 ऑगस्ट 2027 रोजी होईल. शेवटचा कुंभमेळा 2025 मध्ये नाशिकमध्ये भरला होता. यासह 2027 मध्ये हरिद्वार येथे अर्ध कुंभमेळा आयोजित केला जाणार आहे. दर 12 वर्षांनी नाशिक आणि उज्जैन येथे पूर्ण कुंभमेळा भरतो, तर हरिद्वार आणि प्रयागराजमध्ये कुंभमेळा, अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ आयोजित केले जातात. प्रयागराज आणि हरिद्वारमध्ये 6 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला अर्धकुंभ म्हणतात.
कुंभमेळा तारीख-
नाशिकनंतर, 2028 मध्ये उज्जैनमध्ये पूर्ण कुंभमेळा भरेल, त्यानंतर 2030 मध्ये प्रयागराजमध्ये अर्धकुंभमेळा भरेल. वैदिक ज्योतिषशास्त्रातील ग्रह आणि राशींचे विश्लेषण केल्यानंतरच कुंभमेळ्याची तारीख ठरवली जाते. कुंभमेळ्याच्या तारखेसाठी ग्रहांचा राजा सूर्य आणि देवांचा गुरु गुरु यांची हालचाल महत्त्वाची मानली जाते. सूर्य आणि गुरु यांच्या राशीतील बदलाच्या आधारावर कुंभ राशीचे स्थान निश्चित केले जाते. जेव्हा सूर्य आणि गुरु सिंह राशीत असतात तेव्हा महाराष्ट्रातील नाशिक येथे कुंभमेळा आयोजित केला जातो. (हेही वाचा: Mahashivratri 2025: आज महाशिवरात्री दिवशी महाकुंभ मेळ्यातील शेवटचे शाही स्नान; 45 दिवसांच्या उत्सवाचा होणार समारोप, प्रयागराजमध्ये लाखो भाविक जमा)
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ होणार-
सूर्य आणि गुरू सिंह राशीत असल्याने नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ होण्याची शक्यता निर्माण होते, म्हणूनच नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभाला सिंहस्थ कुंभ असेही म्हणतात. हा कुंभमेळा नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठावर भरणार आहे. गोदावरी नदी ही गंगा नदीनंतर दुसरी सर्वात लांब नदी आहे. ही नदी भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 10 % भाग व्यापते. तिला दक्षिणा गंगा असेही म्हणतात आणि ती पश्चिम घाटातील त्र्यंबक टेकडीवरून उगम पावते.