Photo Credit- X

हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2025) सण साजरा केला जातो. यंदा आज, 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी होत आहे. आज महाकुंभाचे शेवटचे स्नान देखील आहे. महाकुंभात 6 अमृत स्नान झाले होते आणि आता शेवटचे अमृत स्नान महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे आज होत आहे. महाशिवरात्रीला ग्रह आणि ताऱ्यांचा दुर्मिळ संयोग आहे, त्यामुळे आजचे महत्त्व आणखी वाढले आहे. त्रिवेणी संगमात स्नान केल्याने सर्व पापे धुऊन जातात आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो, असे मानले जाते. यासोबतच ग्रहांच्या नकारात्मक प्रभावापासूनही आराम मिळतो, त्यामुळे संगमात स्नान करण्यासाठी प्रयागराज येथे लाखो भाविक जमा झाले आहेत. सकाळी 7.28 वाजता या अंतिम स्नानाची सुरुवात झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तांच्या उत्साहाने गजबजून गेला आहे.

45 दिवसांचा महाकुंभ मेळा आज, महाशिवरात्रीच्या दिवशी संपन्न होत आहे. या काळात, विविध आखाड्यांचे नागा साधू आणि भक्तगण संगमावर पवित्र स्नान करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी, विशेषतः काशी विश्वनाथ मंदिरात पूजा-अर्चना करण्यासाठी नागा साधूंची उपस्थिती लक्षणीय आहे. या महाकुंभ मेळ्याच्या समारोपाच्या दिवशी, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, भक्तांच्या मोठ्या संख्येमुळे, प्रशासनाने विशेष ट्रेन आणि वाहतूक व्यवस्थेची तयारी केली आहे.

महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी, चतुर्दशी तिथी, बुधवार आणि श्रावण नक्षत्र यांचे शुभ संयोजन होत आहे. चतुर्दशी तिथीचे स्वामी स्वतः भगवान शिव आहेत. श्रावण नक्षत्र, ज्याचा स्वामी भगवान विष्णू आहेत आणि बुधवार, ज्याचा स्वामी प्रथम पूजनीय भगवान गणेश आहेत. अशाप्रकारे महाशिवरात्रीला, सूर्य आणि बुध यांची कुंभ राशीत युती होत आहे, ज्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य, चंद्र, शनि आणि बुध हे चारही ग्रह एकाच राशीत भ्रमण करतील, त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. आतापर्यंत महाकुंभात 64 कोटींहून अधिक भाविकांनी विक्रमी संख्येने स्नान केले आहे. आज, महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी, सुमारे 2 कोटी लोक अमृत स्नान करतील अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: Maha kumbh 2025: महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभमेळ्यात भाविकांनी केली गर्दी, प्रशासन कडक सुरक्षा यंत्रणेसह सज्ज)

हिंदू धर्मात, महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभमेळ्यात स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की जो कोणी कुंभमेळ्याच्या शेवटच्या दिवशी संगमात स्नान करतो त्याला या जन्मातील तसेच मागील जन्मातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतरही मोक्ष मिळतो. एवढेच नाही तर महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभमेळ्यात स्नान केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि कुंडलीतून पितृदोषही दूर होतो. महाकुंभात स्नान करण्यासाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असला तरी, महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचे स्नान केल्याने अमरत्व मिळते.