मराठी साहित्यतील ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirvadkar) यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांसाठी 27 फेब्रुवारी हा दिवस खास असतो. मराठी बांधवांचा मातृभाषेबद्दल गौरव आणि कवी कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने कवी म्हणून ओळखले जातात. ते एक ज्ञानपीठ विजेते साहित्यिक आहेत. त्यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" ओळखला जाण्यास सुरूवात झाली आहे. February Month Festivals and Special Days: मराठी लोकांसाठी फेब्रुवारी महिना आहे खास; जाणून घ्या या महिन्यात साजरे होणारे सण आणि काही खास दिवस .
मराठी राजभाषा आणि मराठी भाषा गौरव दिन एकच असतो का?
अनेकांची मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन यांच्यामध्ये गल्लत होते. हे दोन्ही एकच दिवस असल्याचं अनेकांना वाटतं पण प्रत्यक्षात तसे नाही. कुसुमाग्रजांच्या सन्मानार्थ 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो तर मराठी राजभाषा दिन हा 1 मे दिवशीचा आहे. मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यामुळे तो दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ आहे. पण याच दिवशी महाराष्ट्र दिन, कामगार दिन सजारा होत असल्याने ‘मराठी राजभाषा दिन’विस्मृतीत गेला आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. म्हणून १ मे हा दिवस ‘राजभाषा मराठी दिन’ म्हणून करावा असा शासन निर्णय आहे.
मराठी भाषा महाराष्ट्रातील पुढील पिढ्यांमध्येही रूजवण्यासाठी मराठी राजभाषा गौरव दिनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांंचे आयोजन केले जाते. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व स्तरांमधून त्यासाठी केंद्र सरकार, राष्ट्रपतींना पत्रं पाठवली जात आहेत.