
Maha Shivaratri 2020: भगवान शंकराची पूजा करणार्यांसाठी महाशिवरात्री (Maha Shivratri) हा दिवस खास असतो. जगभरातील शंकराचे भाविक या दिवशी देवाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र, दूध-पाण्याचा अभिषेक करतात. मुंबई शहरात बाबुलनाथ मंदिर, महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वरमध्ये तर कोकणात कुणकेश्वर मध्ये शंकराच्या मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. माघ वद्य चतुर्दशी'ला महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. यंदा हे व्रत 21 फेब्रुवारी दिवशी आहे. महाशिवरात्री निमित्त सर्व शिवभक्तांमध्ये उत्साह असतो. अनेकजण उपवास, पूजा, जागरण या प्रकारे हे व्रत करतात. महाशिवरात्र या शब्दाचा अर्थ 'शिवाची महान रात्र' असा होतो. महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण देशात असतो. या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण तुम्हाला ठाऊक आहे का, आपल्या भारतात भगवान शंकराची भव्य मंदिरं आहेत, त्या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव कसा साजरा केला जातो. तर जाणून घेऊया भारतातील काही खास शिव मंदिरांविषयी आणि तेथील शिवरात्रीच्या उत्सवाविषयी! Maha Shivratri 2020 Puja Vidhi: भगवान शंकराला बेलपत्र, दूध याचा अभिषेक का करतात?
मंडी, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. मंडी येथील भुतनाथ मंदिरात महाशिवरात्रीची मोठी जत्रा भरते. त्यामुळे भक्त, पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. महाशिवरात्रीनिमित्त भुतनाथ मंदिर फुलांनी सुंदररीत्या सजवण्यात येते. महाशिवरात्रीचा हा सोहळा आठवडाभर चालतो. हजारो लोकांनी फुललेली शोभायात्रा हे या उत्सवाचे मोठे आकर्षण असते.

वाराणसी, उत्तर प्रदेश
वाराणसी या शहराला आध्यामिक वारसा आहे. येथे नदीच्या किनारी अनेक मंदिरं आहेत. येथे भगवान शंकराचे मंदिर देखील आहे. महाशिवरात्रीचा या ठिकाणी मोठा असतो. या उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने लोक येतात. या उत्सवात शिव-पार्वतीचा विवाहसोहळाही पार पडतो. त्यानंतर शहरातून लग्नाची वरात निघते. यासाठी अनेक भक्तगण उत्सुक असतात. त्यामुळे हा आनंदाने नटलेला सोहळा अत्यंत देखणा असतो. भारतात 'या' ठिकाणांवर आहेत भगवान शंकर यांच्या सर्वात मोठ्या प्रतिमा.
पुरी, ओडिसा
पुरी येथील लोकनाथ या मंदिरात भगवान रामाने शिवलिंगाची स्थापना केली, अशी धारण आहे. तेव्हापासून येथे नित्यनियमाने भगवान शंकाराची पूजा केली जाते. येथील शिवलिंग हे काहीसे पाण्यात असल्याने पटकन दृष्टीस पडत नाही. मात्र अनेक शिवभक्त येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

श्रीकालहस्ती, आंध्र प्रदेश
दक्षिण भारतात देखील महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आंध्रप्रदेशातील श्रीकालहस्थिसवाडा हे अतिशय लोकप्रिय मंदिर आहे. येथे शिव-पार्वतीचा विवाहसोहळा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. हा सोहळा तब्बल 13 दिवस रंगतो. यावेळेस शिव-पार्वतीच्या मुर्ती अगदी सुरेखरीत्या सजवल्या जातात आणि त्यानंतर वरात निघते.
ऋषिकेश आणि हरिद्वार, उत्तराखंड
ऋषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त अनेक भक्त गर्दी करतात. हरिद्वार येथील हर की पौरी आणि ऋषिकेश येथील निळकंठ मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त मोठी गर्दी होते.

उज्जैन, मध्य प्रदेश
उज्जैन येथील महाकाळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव असतो. हे 12 ज्योर्तिलिंगापैकी एक मंदिर असल्याने येथे येणाऱ्या भक्तांची संख्याही अधिक असते. या मंदिराची एक कथा आहे. दुष्णा नावाचा एक राक्षस होता. तो अवंती गावच्या रहिवाशांना त्रास देत असे. या त्रासातून लोकांची सुटका करण्यासाठी भगवान शंकराने या राक्षसासोबत युद्ध केले. त्यानंतर सर्व लोकांनी भगवान शंकरांना तिथेच राहण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देवून भगवान शंकर महाकाळेश्वर मंदिरात वसले.

महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभरात अगदी उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील अनेक शिवमंदिरे सजतात आणि भक्तांनी फुलून जातात. प्रार्थना, पूजा, आरत्या, शोभा यात्रा या विविध प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी बेलाचे पान, चंदन, धुप, दीप, भांग, धतूरा, हळद, पाच प्रकारचे फुले, पांढरी मिठाई, गाईचं दूध, दही, मध, पवित्र गंगाजल, कापूर, वस्त्रभूषण, आदी सामुग्रीची आवश्यकता असते. या दिवशी भगवान शंकराला त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात.