Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: सुशासन दिवस निमित्त जाणून घ्या दिवगंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary (PC -Getty)

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस (25 डिसेंबर) हा 'सुशासन दिवस' (Good Governance Day) म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारने अटलबिहारी वाजपेयी यांना आदर आणि सन्मान देण्यासाठी त्यांच्या जन्मदिवस 'सुशासन दिवस' म्हणून घोषित केला. अटलबिहारी वाजपेयी यांचा देशाच्या संसदीय राजकारणात आणि भारतीय जनता पक्षाच्या यशाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. आज या दिवसाचे औचित्य साधून या लेखाच्या माध्यमातून आपण अटलबिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात...

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 मध्ये झाला. वाजपेयी हे भाजप पक्षाचे संस्थापक सदस्य असून ते पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते होते. भाजप पक्षाने 1996 मध्ये पहिल्यांदा मित्र पक्षाच्या पाठिंब्याने केंद्रात सत्ता मिळवली. वाजपेयी हे भारताचे दहावे पंतप्रधान होते. वाजपेयी हे उत्तम राजकारणी तसेच हिंदी कवीही होते. वाजपेयी हे 1991 ते 2009 दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ 13 दिवस टिकलेल्या 11 व्या लोकसभेत तसेच 12 व्या लोकसभेत पंतप्रधान होते.

हेही वाचा - National Mathematics Day: भारतातील 'हे' 5 महान गणित तज्ञ तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

एप्रिल 1999 मध्ये जयललिता यांच्या पक्षाने पाठिंबा काढल्यामुळे वाजपेयी यांचे सरकार कोसळले. त्यानंतर पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळी वाजपेयी यांनी 1999 ते 2004 असा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यावेळी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले. विशेष बाब म्हणजे अटल बिहारी वाजपेयी तब्बल 10 वेळा लोकसभेवर आणि 2 वेळा राज्यसभेवर निवडून आले होते. तसेच मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते.

मागच्या वर्षी केंद्र सरकारने वाजपेयी यांच्या जयंतीच्या एक दिवस अगोदर 100 रुपयांचे नाणे जारी केले होते. 2014 मध्ये 25 डिसेंबरला वाजपेयींच्या जन्मदिनी राष्ट्रपतींनी वाजपेयी यांना 'भारतरत्न' हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरास्काराने सन्मानित केले. विशेष म्हणजे वाजपेयी यांच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 ऑगस्ट 2018 ला दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. वाजपेयी यांच्या अंतरद्वंद्व, अपने ही मन से कुछ बोलें, ऊँचाई, एक बरस बीत गया, कदम मिला कर चलना होगा, आदी कविता प्रसिध्द आहेत. 25 डिसेंबर 2014 पासून केंद्र सरकारने अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या दिवशी 'सुशासन दिवस' साजरा करण्याला सुरुवात केली.