Kartiki Ekadashi 2019 Date: कार्तिकी म्हणजेच देव उठनी एकादशी यंदा 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या या एकादशीचं महत्त्व
Vitthal-Rukmini | Photo Credits: Facebook

Dev Uthani Ekadashi 2019: विठ्ठल रूक्मिणीच्या भक्तांसाठी आषाढी एकादशी नंतर येणार्‍या कार्तिकी एकादशीचं विशेष महत्त्व असतं. यंदा ही कार्तिकी शुद्ध एकादशी 8 नोव्हेंबर 2019 दिवशी साजरी केली जाणार आहे. कार्तिकी एकादशी दिवशी आषाढी पासून सुरू झालेला चातुर्मास संपतो. त्यामुळे वारकरी बांधव विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरामध्ये दाखल होतात. तितक्याच भक्तीभावाने पांडुरंगाचं दर्शन घेतात. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि सीमाभागावरील प्रांतातही भाविक हा कार्तिकी एकादशीचा सण साजरा करतात. कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) किंवा देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) म्हणून देखील ओळखली जाते.

भगवान विष्णूचं रूप असलेला विठूराया चातुर्मास संपवून कार्तिकी एकादशी दिवशी उठतात. त्यामुळे देव शयनी नंतर चार महिन्यांनी येणारी ही देव उठनी एकादशी देखील खास असते. पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आता 24 तास भाविकांसाठी खुले राहणार, दर्शन देताना विठ्ठल-रुक्मिणीला थकवा येऊ नये म्हणून केली ही विशेष तयारी.

कार्तिकी / प्रबोधिनी एकादशी तारीख, तिथी

कार्तिकी एकादशी तारीख - 8 नोव्हेंबर 2019 (शुक्रवार)

एकादशी तिथी - 7 नोव्हेंबर सकाळी 10 वाजल्यापासून 8 नोव्हेंबर दिवशी 12.25 पर्यंत कार्तिकी एकादशी आहे.

कार्तिकी एकादशी पूजा विधी

कार्तिकी एकादशी दिवशी विठू भक्त एकादशीचा उपवास करतात. दिवसभर उपवास करून दुसर्‍या दिवशी तो सोडला जातो. तसेच कार्तिकी एकादशी दिवशी वारकरी बांधव पंढरपूरामध्ये विठूरायाचं दर्शन घेतात. मात्र ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं. ते जवळच्या विठ्ठल मंदिरात भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतात.

हिंदू परंपरेनुसार देव उठनी ही एकादशी सर्वात मोठी आणि फलदायी मानली जाते. या दिवसाच्या आधी 4 महिने भगवान विष्णु समुद्रात झोपलेले असतात. मात्र या दिवशी विष्णु निद्रेतून जागे झाल्यानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते. रुढीनुसार,या एकादशीचे व्रत केल्यास सर्व भक्तांचे पाप नष्ट होऊन स्वर्ग प्राप्ती होणार असल्याचे समजले जाते.